– ३५ सभासदांचा सहभाग; धार्मिक दर्शनासोबत स्नेहबंधही झाले वृद्धिंगत
नागपूर :- ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर व अमर नगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी २७ सप्टेंबर रोजी, कोटेश्वर व खडकी या तीर्थक्षेत्रांची दर्शन सहल आयोजित करण्यात आली. या सहलीत ३५ सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग घेत धार्मिक व आध्यात्मिक वातावरणाचा आनंद घेतला. सहली दरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी खडकी येथील श्री हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रार्थना केली. त्यानंतर कोटेश्वर येथे जाऊन श्री कोटेश्वराचे दर्शन घेतले. धार्मिक स्थळांच्या भेटीमुळे ज्येष्ठ नागरिकांना आध्यात्मिक समाधान व प्रसन्नतेचा अनुभव मिळाला. ही सहल ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव राजूजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अमर नगर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देविदास आगरकर यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित करण्यात आली. सहल यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव वसंतराव इझनकर, उपाध्यक्ष गणपतराव निंबाळकर, शोभा आगरकर, निंबाळकर व रासेकर यांनी परिश्रम घेतले. सहलीत गोजे, बावनकर, अरमरकर, वाकोडीकर, सिंगरू, मस्के, बागडे, खोडे, शिंदे, मुंगळे, धनजोडे, जयस्वाल, चौधरी यांच्यासह अन्य सभासदांनी सहभाग घेतला. तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाबरोबरच या सहलीमुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनातील धावपळीपासून काही काळ दूर राहून परस्परांशी संवाद साधण्याची, जुन्या आठवणींना उजाळा देण्याची आणि आपुलकीचे संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळाली. सहलीदरम्यान निर्माण झालेले आनंदाचे व उत्साहाचे वातावरण सर्वांसाठी संस्मरणीय ठरले. ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक व मानसिक प्रसन्नतेसोबतच सामाजिक आणि आध्यात्मिक जडणघडणीसाठी अशा सहली उपयुक्त ठरतात. त्यामुळे भविष्यातही ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटनस्थळांच्या सहली वारंवार आयोजित कराव्यात, अशी अपेक्षा सहभागी ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.








