– शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार
नागपूर :- भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर शिक्षक आघाडीच्या कार्यकारणीची घोषणा नुकतीच करण्यात आली.कार्यकारिणीच्या घोषणेचा कार्यक्रम भाजप शहर कार्यालय मंगलम बिल्डिंग मॉडेल मिल्स चौक येथे आयोजित केला होता.कार्यक्रमाला सर्व नवनियुक्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे नागपूर महानगर अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी होते. प्रमुख अतिथी म्हणून महापौर निताताई ठाकरे, विधानपरिषद आमदार संजयजी भेंडे, माजी आमदार सुधाकर कोहळे उपस्थित होते.
यावेळी नागपूर महानगर शिक्षक आघाडी अध्यक्ष राजकुमार कनाटे, महामंत्री रामू गोतमारे,योगेश बन, शिक्षक आघाडी पूर्व विदर्भ संयोजक अनिल शिवणकर, सहसंयोजक नरेश कामडे, शिक्षक आघाडी माजी अध्यक्ष प्रदीप बिबटे, नागपूर महानगर महामंत्री श्रीकांत आगलावे, संपर्कमंत्री विष्णुजी चांगदे तसेच शिक्षक आघाडीचे अनेक पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मान्यवर आथितींच्या हस्ते उपस्थित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना विधानपरिषद सदस्य आमदार संजय भेंडे यांनी शिक्षकांच्या विविध समस्या व त्यांच्या सोडवणुकीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी “शिक्षक हा समाजाचा कणा आहे, शिक्षकाशिवाय समाज घडू शकत नाही” असे नमूद केले.
महापौर निता ठाकरे यांनी नवनियुक्त कार्यकारिणीवर विश्वास व्यक्त करत, ही आघाडी शिक्षकांच्या हितासाठी नक्कीच चांगले कार्य करेल, अशी ग्वाही दिली.
अध्यक्षीय भाषणात दयाशंकर तिवारी यांनी संघटन कसे मजबूत करावे, शिक्षकांपर्यंत पक्षाची भूमिका कशी पोहोचवावी आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कशा पद्धतीने काम करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन महामंत्री सुधीर अनवाने यांनी केले तर प्रा. नेहा निगोट यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमाची सांगता स्वरुची भोजनाने झाली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फुटावी आणि संघटन अधिक मजबूत व्हावे, यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या.








