spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

१२ दिवसांच्या बाळाच्या आईचा संसार तुटण्यापासून पोलिसांनी वाचवला !

– राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत पोहोचलेला कौटुंबिक वाद समुपदेशनातून मिटवला; महिला पोलीस हवालदार दीप्ती मोटघरे यांच्या प्रयत्नांना यश

संदीप कांबळे,कामठी :- गैरसमज, कौटुंबिक वाद आणि बाहेरील व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे संसाराची वीण उसवण्याच्या मार्गावर असलेल्या एका दाम्पत्याच्या आयुष्यात नवीन आशेचा किरण निर्माण करण्यात नवीन कामठी पोलिसांना यश आले आहे. अवघ्या १२ दिवसांच्या बाळाच्या आईने पतीपासून कायमचे विभक्त होण्याचा निर्णय घेत राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली येथे तक्रार केली होती. मात्र, नवीन कामठी पोलिसांनी संवेदनशीलतेने केलेले समुपदेशन, संवादातून दूर केलेले गैरसमज आणि दोघांनाही समजून घेण्याची दिलेली संधी यामुळे पती-पत्नी पुन्हा एकत्र आले असून त्यांनी नव्याने संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कौटुंबिक नात्यांमधील तणाव केवळ कायदेशीर कारवाईनेच नव्हे, तर योग्य संवाद आणि समंजस मध्यस्थीनेही दूर होऊ शकतो, याची प्रचिती या घटनेतून आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका सुशिक्षित दाम्पत्याचा विवाह झाल्यानंतर काही काळाने कौटुंबिक कारणांवरून दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. सुरुवातीला किरकोळ स्वरूपात असलेले वाद पुढे वाढत गेले. परिणामी, पती-पत्नीमधील संवाद कमी झाला आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली.

पत्नी गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात सासर सोडून माहेरी आली. त्यानंतर तिने पतीविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली येथेही तक्रार करण्यात आली. आयोगाकडून प्राप्त झालेल्या पत्राच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्यासाठी नवीन कामठी पोलिसांनी संबंधित महिलेला पोलीस ठाण्यात बोलावले.

दरम्यान, माहेरीच तिची प्रसूती झाली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्माला अवघे १२ दिवस झाले असताना हे प्रकरण पोलिसांसमोर आले.

नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार दीप्ती मोटघरे यांनी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी संबंधित महिलेचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. तिच्या मनातील नाराजी, कौटुंबिक तक्रारी आणि पतीबाबतच्या शंकांवर सविस्तर संवाद साधला.

त्यानंतर पतीशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दोघांनाही आपापली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. संवादादरम्यान अनेक दिवसांपासून दूर असलेल्या पती-पत्नीच्या भावना उफाळून आल्या. परस्परांमधील संवादाचा अभाव आणि गैरसमज यांमुळे निर्माण झालेली दरी स्पष्ट होऊ लागली.

यानंतर पतीला पोलीस ठाण्यात बोलावून दोघांचेही समुपदेशन करण्यात आले. वादामागील कारणांचा शोध घेत एकमेकांशी थेट संवाद साधण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. बाहेरील व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे मतभेद वाढत असतील, तर त्यावर विवेकाने तोडगा काढावा; रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबाचे भविष्य प्रभावित होऊ नये, याची जाणीव करून देण्यात आली.

समुपदेशनादरम्यान पती-पत्नीने एकमेकांचे म्हणणे ऐकून घेतले. परस्परांतील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न झाला आणि दोघांनीही नात्याला नव्याने संधी देण्याचा निर्णय घेतला. अनेक महिन्यांपासून विभक्त राहिलेल्या या दाम्पत्याने पुन्हा एकत्र येत संसार सुरू करण्याची तयारी दर्शवली.

अवघ्या १२ दिवसांच्या बाळाच्या भविष्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला. मात्र, या प्रकरणातील सकारात्मक बाब म्हणजे पोलिसांनी केवळ तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यापुरती भूमिका मर्यादित न ठेवता, परिस्थितीला अनुरूप संवाद आणि समुपदेशनाचा मार्ग स्वीकारला.

आजच्या धकाधकीच्या जीवनात कौटुंबिक नात्यांमध्ये मतभेद होणे स्वाभाविक असले, तरी गैरसमज, अहंकार आणि अनावश्यक हस्तक्षेपामुळे ते टोकाला जाऊ शकतात. अशा वेळी एकमेकांचे म्हणणे समजून घेणे, शांतपणे संवाद साधणे आणि गरज भासल्यास तज्ज्ञ किंवा प्रशिक्षित समुपदेशकांची मदत घेणे महत्त्वाचे ठरते.

नवीन कामठी पोलिसांनी केलेल्या या प्रयत्नातून पोलिसांची सामाजिक बांधिलकी आणि कौटुंबिक वादांच्या निवारणातील समुपदेशनाचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. महिला पोलीस हवालदार दीप्ती मोटघरे यांच्या पुढाकाराने एका कुटुंबाला पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली असून, या घटनेमुळे समाजात संवाद, संयम आणि परस्पर समजूतदारपणाचा संदेश पोहोचला आहे.

Popular Articles