spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठीत जनसेवेचा पुढाकार; ३१० नागरिकांना दिला आरोग्य व ई-श्रम कार्डचा लाभ

– लोकसेवक सुशांत यादव यांच्या पुढाकारातून दोन ठिकाणी मोफत शिबिर

संदीप कांबळे,कामठी :- शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी केवळ योजनांची घोषणा नव्हे, तर पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे आवश्यक असते. याच सामाजिक बांधिलकीतून यादवनगर रहिवासी लोकसेवक सुशांत यादव यांच्या पुढाकाराने कामठी शहरात आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय जनसेवा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराच्या माध्यमातून एकूण ३१० नागरिकांनी मोफत आरोग्य कार्ड व ई-श्रम कार्ड बनवून घेतले. गरजू नागरिकांना शासकीय योजनांशी जोडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

कामठी शहरातील यादव नगर येथील श्रीकृष्ण मंदिर आणि भवानी चौकातील शीतला माता मंदिर अशा दोन ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांना घराजवळच नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देत शासकीय योजनांचा लाभ मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

शिबिरात विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगार, श्रमिक, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू कुटुंबांनी सहभाग नोंदविला. दैनंदिन कामकाजातून वेळ काढून शासकीय कार्यालयांमध्ये जाणे अनेक नागरिकांना शक्य होत नाही. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात येणारी जनसेवा शिबिरे नागरिकांसाठी उपयुक्त ठरतात. आरोग्य कार्ड आणि ई-श्रम कार्डच्या नोंदणीसाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

शासकीय योजनांचा लाभ पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचविणे ही सामाजिक उत्तरदायित्वाची महत्त्वाची बाब आहे. योजनांची माहिती, नोंदणीसाठी मार्गदर्शन आणि आवश्यक प्रक्रियेत सहकार्य मिळाल्यास अनेक गरजू नागरिकांना लाभाच्या प्रवाहात आणता येते. याच भूमिकेतून सुशांत यादव यांनी आयोजित केलेल्या या शिबिरातून ३१० नागरिकांना लाभ मिळविण्याची संधी उपलब्ध झाली.

शिबिराला मिळालेल्या प्रतिसादातून नागरिकांना आवश्यक सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याची गरज स्पष्ट झाली. समाजातील वंचित, श्रमिक आणि गरजू घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा जनसेवी उपक्रमांना सातत्य मिळणे आवश्यक आहे.

Popular Articles