spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हैद्राबादहून येणाऱ्या भरधाव ट्रकच्या धडकेत केळापूरचा इसम जागीच ठार; संतप्त गावकऱ्यांनी केला रस्ता जाम

पांढरकवडा :- हैद्राबादहून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका तरुणाला चिरडल्याची अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना केळापूर येथे घडली. या अपघातात संतोष अवरुंडवार वय ५० वर्षे (रा. केळापूर) असे मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. धडक इतकी भीषण होती की, तरुणाचे शरीर अक्षरशः छिन्नविछिन्न होऊन रस्त्यावरून फरफटत गेल्याने सपाट झाले होते.

संतोष अवरुंडवार हे शेतात बांधलेले बैल सोडून घराकडे परत येत असताना, रस्त्याच्या साईडला चालले होते. यादरम्यान हैद्राबादकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्र. एच आर ५५ ए एम ८७५२ या ट्रकने मागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भयानक होता की, मृत व्यक्तीचे केवळ मुंडके, एक पाय आणि एक हात एवढेच अवशेष शिल्लक राहिले होते, बाकीचे शरीर रोडवर घासले गेल्यामुळे पूर्णपणे सपाट झाले होते. या अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने उपस्थितांचे डोळे पानावले.

दरम्यान, केळापूर येथे सध्या उडान पुलाचे (फ्लायओव्हर) काम सुरू आहे. या सुरू असलेल्या कामामुळे येथे सतत वाहनांचे अपघात होत असून, प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या संतप्त परिस्थितीमुळे समस्त गावकऱ्यांनी घटनास्थळी एकत्र येत बराच वेळ रस्ता जाम करून तीव्र आंदोलन केले.

मोठ्या यात्रेपूर्वी चिंतेचे वातावरण:

सध्या काही दिवसांवरच नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. केळापूर येथील प्रसिद्ध आई जगदंबा मंदिरामध्ये नवरात्रीनिमित्त सलग दहा दिवस मोठी यात्रा भरते. यात्रेत हजारो भाविकांची गर्दी लोटणार असून, उडान पुलाच्या या रखडलेल्या आणि असुरक्षित कामामुळे पुढे मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? याचा गावकऱ्यांना गंभीर प्रश्न पडला असून, आगामी काळातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे

Popular Articles