spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सोनेगावच्या उड्डाणपुलास ग्रामस्थांचा विरोध

– ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे निवेदन

बेला :- जवळच्या सोनेगाव (लोधी) येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल बांधण्यास ग्रामस्थांनी आक्षेप घेतला असून त्यांचे तक्रारीवरून गट ग्रामपंचायतने ठराव पारित करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवला आहे.

सोनेगाव (लोधी) येथून नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ गेला आहे.वाढती वर्दळ वाहतूक लक्षात घेता लवकरच हा मार्ग सहा पदरीकरण करण्यात येणार आहे. येथूनच बेला, सिरसीचा रस्ता जोडला गेला आहे. जवळपासच्या अनेक खेड्यांची बाजारपेठ बेला आहे. याशिवाय, आयडियल एनर्जी प्रोजेक्ट व मानस ऍग्रो अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी येथे आहे. त्यांची असंख्य अवजड वाहने व इतरही,बस,ट्रक आदी वाहनांची सोनेगावच्या टी पॉइंटवरून मोठ्या प्रमाणात आवक जावक रात्रंदिवस सुरू असते. महामार्गाच्या कंकणाकृती वळणावरच टी पॉईंट असल्याने हे अपघाती ठिकाण झाले आहे.त्यामुळे दळणवळण सुलभ होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथे ओव्हर ब्रिज बांधणार असल्याची चर्चा आहे.

मागील वर्षापासून सोनेगाव लोधी येथे बुधवारला आठवडी बाजार भरतो.तसेच, महामार्गावर गावालगत पेट्रोल पंप,अनेक हॉटेल,बार,रेस्टॉरंट असल्यामुळे चहा कॅन्टीन, पान टपऱ्या व इतरही धंदे येथे बऱ्यापैकी चालतात. प्रस्तावित ओव्हर ब्रिजमुळे उपजीविका धोक्यात येण्याची व्यापाऱ्यांना भीती वाटत आहे. त्यातून गावातील अंदाजे चारशे नागरिक व व्यापाऱ्यांनी सोनेगाव लोधीचे गट ग्रामपंचायत कार्यालयात आक्षेपाचा तक्रार अर्ज दिला.प्राप्त तक्रारीवरून २४ सप्टेंबरला सरपंच नीलिमा ढगे व सचिव पंकज चाफले यांनी ठराव पारित करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालयात कार्यकारी अभियंता यांचेकडे पाठवला आहे.

ठराव व निवेदनाच्या प्रती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री बावनकुळे,आमदार समीर मेघे व इतर संबंधितांना पाठवल्या आहेत.

प्रतिक्रिया – सोनेगाव (लोधी) चे हद्दीतून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर ओव्हर ब्रिज बांधण्या संदर्भात ग्रामपंचायतला पत्र आले नाही.अथवा, महामार्ग प्राधिकरणाने ग्रामपंचायतची परवानगी सुद्धा मागितली नाही. नागरिक व व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने येथे उड्डाणपूल बांधण्यात येऊ नये.

नीलिमा अशोक ढगे सरपंच सोनेगाव (लोधी)

Popular Articles