spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समितीच्या प्रयत्नांना यश; उड्डाणपुलाच्या पिलर्सवर साकारले अहिल्यादेवींचे भव्य चित्र

नागपूर :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची, विचारांची व प्रेरणादायी जीवनाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्या स्मृती नव्या पिढीसमोर जपल्या जाव्यात, या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती, नागपूर यांच्या वतीने करण्यात आलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नागपूर शहरातील डागा हॉस्पिटल चौक परिसरातील उड्डाणपुलाच्या पिलर्सवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे घोड्यावरील भव्य व आकर्षक पेंटिंग साकारण्यात आले आहे. या चित्रामुळे उड्डाणपुलाच्या परिसराला ऐतिहासिक व सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले असून, ये-जा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. यासंदर्भात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समितीच्या वतीने नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI), नागपूर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती. पत्रात नागपूर शहरातील इंदोरा चौक ते दिघोरी उड्डाणपुलाच्या बांधकामा दरम्यान पूर्ण झालेल्या भागातील पिलर्सवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे छायाचित्र / चित्र रेखाटण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली होती.अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन विविध उपक्रम राबवत असल्याचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला होता. या मागणीचा सकारात्मक विचार होऊन प्रत्यक्षात पिलर्सवर अहिल्यादेवी होळकर यांचे आकर्षक चित्र साकारण्यात आले. त्यामुळे स्मृती समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या संपूर्ण कार्यासाठी महादेवराव पातोंडे, विठ्ठलराव निघोट, डॉ. विनोद बरडे, श्याम थोरात, ईश्वर मोरे, अनिल ताबंडे, शरद उरकुडे, रामजी सोनाग्रे, मधुकर काळमेघ आणि भालचंद्र महाजन यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि सामाजिक भावनेतून केलेल्या प्रयत्नांमुळे अहिल्यादेवींचे भव्य चित्र उड्डाणपुलाच्या पिलर्सवर साकारले गेले आहे. “अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य, त्यांचे प्रशासन कौशल्य, समाजकल्याणाची दृष्टी आणि महिला सक्षमीकरणाचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जीवनकार्याचे दर्शन घडविणे आवश्यक आहे. या उपक्रमामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल,” अशी भावना स्मृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे नागपूर शहराच्या सार्वजनिक परिसरात इतिहास, संस्कृती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविणारे एक सुंदर स्थळ निर्माण झाले असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला ही एक आगळीवेगळी आदरांजली ठरली आहे.

Popular Articles