spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एकात्मता उच्च प्राथमिक विद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

नागपूर :- एकात्मता उच्च प्राथमिक विद्यालय, एकात्मता नगर, जयताळा, नागपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सत्य, अहिंसा आणि स्वच्छता या गांधीजींच्या जीवनातील मूलभूत मूल्यांची माहिती देण्यात आली. स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजावे यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय परिसराची स्वच्छता केली. “स्वच्छ शाळा, सुंदर शाळा” या भावनेतून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. याचबरोबर ‘आनंदी शनिवार’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आकर्षक चित्रे काढून आपल्या कलागुणांना वाव दिला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शरद उरकुडे सर यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याची व देशासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. गांधीजींनी दिलेला सत्य, अहिंसा, स्वच्छता, साधेपणा आणि शिस्त यांचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक शरद उरकुडे तसेच सहाय्यक शिक्षिका शुभांगी कातुरे, सुनिता गावंडे, धनश्री ढेगेकर आणि सोनम फुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महात्मा गांधी जयंतीचा कार्यक्रम ज्ञान, स्वच्छता, कला आणि मूल्यशिक्षणाचा सुंदर संगम ठरला.

Popular Articles