किशोर साहू, मौदा :- शुक्रवार (ता.२ऑक्टोबर) ला जिल्हा परिषद प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल, भोवरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. मुख्याध्यापिका कुमारी पठाण तब्बसूम अयुबखान यांनी विद्यार्थ्यांना गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचे विचार सांगितले. तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या “जय जवान, जय किसान” या घोषवाक्याचे महत्त्व पटवून दिले.
जयंती निमित्त शाळेत स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ या संकल्पनेतून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर, वर्गखोल्या आणि शाळेचे मैदान स्वच्छ केले. विद्यार्थ्यांनी “स्वच्छता हीच सेवा” असा नारा दिला.
यावेळी विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनावर आधारित भाषणे, गाणी आणि घोषवाक्ये सादर केली.
याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश निरगुळकर, उपाध्यक्ष प्रल्हाद वैद्य, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ गिर्हेपुंजे, माता पालक अश्विनी बावणे, निकिता वैद्य, ज्योती वैद्य, ग्रामस्थ श्याम वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांनी केले.








