किशोर साहू, मौदा :- कोदामेंढी येथे एकूण तीन बूथ असून बुथ क्रमांक 160 मध्ये 1160 मतदारांपैकी 948 मतदार, बूथ क्रमांक 161 मध्ये 1108 मतदारांपैकी 973 मतदार तर बुथ क्रमांक 162 मध्ये 809 मतदारांपैकी 660 मतदारांची नावे विशेष सखोल पुनरिक्षण 2026 चे अंतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादी समाविष्ट करण्यात आलेले आहे. इतर उर्वरित मतदारांची नावे मतदार मृत पावल्यामुळे, लग्न झाल्याने किंवा इतर कारणामुळे स्थानांतर झाल्यामुळे व इतर कारणामुळे वगळण्यात आलेली आहे.समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांपैकी मतदारांची नावे मॅपिंग न झालेल्या व इतर कारणामुळे बूथ क्रमांक 160 मधील 73 मतदारांना, बूथ क्रमांक 161 मधील 40 मतदारांना तर बूथ क्रमांक 162 मधील 92 मतदारांना नोटीस बजावण्यात आल्या. बूथ क्रमांक 161 व बुथ क्रमांक 162 मधील नोटीस बजावलेल्या मतदारांची सुनावणी आज सोमवार (ता.5 ऑक्टोबर)ला घेण्यात आली. उद्या मंगळवार (ता. 6 ऑक्टोबर)ला बूथ क्रमांक 162 मधील नोटीस बजावलेल्या मतदारांची अंतिम सुनावणी ग्रामपंचायत कार्यालय कोदामेंढी येथे होणार असल्याचे नोटीस मध्ये नमूद करण्यात आले.
बूथ क्रमांक 160 मधील 73 मतदारांची सुनावणी ग्रामपंचायत कार्यालय येथे सोमवार (ता. 5 ऑक्टोबर)ला दुपारी 12:30 ते 2:30 दरम्यान तर बूथ क्रमांक 161 मधील 40 मतदारांची सुनावणी दुपारी 3 ते सायं.5 दरम्यान घेण्यात आली. तर बूथ क्रमांक 162 मधील 92 मतदारांची सुनावणी उद्या मंगळवार (ता.6 ऑक्टोबर)ला दुपारी 12 ते 2:30 दरम्यान होणार असल्याचे बूथ क्रमांक 162 चे बीएलओ दुर्गा ढोमणे यांनी आज सायं. दरम्यान भ्रमणध्वनीवरून सांगितले.
प्रारूप मतदार यादीतही SIR पूर्वीच्या मृत पावलेल्या काही मतदारांची नावे कायम असल्याची माहिती सोशल मीडियाच्या ग्रुप वर ग्रामपंचायत सदस्य स्वाती संदीप गौरखेडे यांचे पती तथा पत्रकार संदीप गौरखेडे यांनी एक आठवड्यापूर्वी बीएलओ यांनी प्रारूप मतदार याद्या ग्रामपंचायतला दिल्यानंतर नुकतीच टाकली होती. याबाबत बूथ क्रमांक 160 च्या बीएलओ माधुरी बावनकुळे, 161 च्या बीएलओ सूर्यकांता बावनकुळे यांना भ्रमणध्वनी वरून व प्रत्यक्ष जाऊन याबाबत विचारपूस केली असता चुकीने 1-1 मृत मतदाराचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट असल्याचे त्यांनी मान्य केले व ते नाव आता सुनावणी दरम्यान कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बूथ क्रमांक 162 मध्ये SIR पूर्वी एकही मृत व्यक्तीची नावे समाविष्ट नसून SIR झाल्यानंतर मृत पावलेल्या मतदारांची नावे आता सुनावणी दरम्यान कमी करण्यात येणार असल्याचे बीएलओ दुर्गा ढोमणे यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले. त्यामुळे नवीन मतदार यादी ही शंभर टक्के मतदारांची कलर फोटो असलेले, अचूक व संपूर्ण पारदर्शित बनणार असल्याचे तीनही बीएलओ यांनी सांगितले.








