spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलला आशियाई व जागतिक कर तज्ज्ञ शिष्टमंडळाची सदिच्छा भेट

– प्रतिनिधींतर्फे ॲड. सुलेखा कुंभारे यांचा मानचिन्ह देऊन सत्कार; आंतरराष्ट्रीय स्तरावर कामठीचा गौरव

कामठी :- जागतिक स्तरावर शांतता, करुणा आणि बंधुभावाचे प्रतीक ठरलेल्या कामठी येथील ऐतिहासिक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ड्रॅगन पॅलेस टेम्पलला राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने विविध देशांतील उच्चपदस्थ प्रतिनिधी आणि कर अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट दिली.

ग्लोबल फोरम ऑन ट्रान्सपरन्सी अँड एक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन फॉर टॅक्स पर्पजेस (Global Forum) च्या ‘आशिया इनिशिएटिव्ह’ अंतर्गत एनएडीटी, नागपूर येथे ५ व्या विशेष प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भारतासह मालदीव, थायलंड, व्हिएतनाम, इक्वेडोर तसेच फ्रान्स येथील वरिष्ठ कर अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या सुमारे ६० प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलला प्रत्यक्ष भेट दिली.

ॲड. सुलेखा कुंभारे यांचा सत्कार व मार्गदर्शन

या दौऱ्यादरम्यान उपस्थित आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख तथा माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांना मानचिन्ह प्रदान करून त्यांचा अत्यंत स्नेहील आणि भावपूर्ण सत्कार केला. यावेळी ॲड. सुलेखा कुंभारे यांनी सर्व परदेशी व भारतीय प्रतिनिधींचे आत्मीयतेने स्वागत केले. तसेच त्यांनी शिष्टमंडळाला ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा प्रेरणादायी इतिहास, वास्तुकला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि ड्रॅगन इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या जागतिक कार्याविषयी व महत्त्वाविषयी सविस्तर माहिती दिली.

एनएडीटीतर्फे विशेष पुढाकार

या अभ्यास दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या उपसंचालक (P&R) शरायू आधे यांनी ॲड. सुलेखाताई कुंभारे यांना पत्राद्वारे संपर्क साधून परदेशी प्रतिनिधींना ड्रॅगन पॅलेसचा ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व विशद करण्यासाठी विशेष सहकार्याची विनंती केली होती.

या शिष्टमंडळात मालदीवचे इब्राहिम आफाक, अमिनाथ हुशमा अहमद; थायलंडच्या कोर्णचासा बूनचाई, नोनथामन चायखम; व्हिएतनामचे मिन्ह खांग ट्रान, मन्ह हुंग न्गुयेन; ओईसीडी (OECD) चे जेमे पाझमिनो (इक्वेडोर), रेनल्ड वेल (France) यांच्यासह भारतातील विविध राज्यांतील आयकर विभागाचे सहसंचालक, उपसंचालक आणि एनएडीटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

परिसरातील विलोभनीय शांतता, अप्रतिम वास्तुरचना आणि तथागत बुद्धांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन शिष्टमंडळाने मनापासून समाधान व्यक्त केले. या आंतरराष्ट्रीय भेटीमुळे कामठीच्या सांस्कृतिक आणि पर्यटन लौकिकात पुन्हा एकदा मोलाची भर पडली आहे.

Popular Articles