मनपाच्या यंग कलाम विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन सेवा संकल्प अभियानाअंतर्गत मनपाचे आयोजित
नागपूर :- नागपूर महापालिकेच्या शाळांमधील जवळपास 200 विद्यार्थ्यांनी विविध विज्ञानाचे विविध मॉडेल तयार करून वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचा प्रयत्न केला. नागपूर महानगरपालिका, एचसीएल फाऊंडेशन व एसईडीटीच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आयोजित यंग कलाम विज्ञान महोत्सवाचे आज (ता. 9) उद्घाटन झाले.
यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, शिक्षणाधिकारी अमित भदाने, एचसीएल फाऊंडेशनचे पियूष वानखेडे, सोशिओ-इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ट्र्स्टचे (एसईडीटी) अजिंक्य कुलकर्णी व विज्ञान महोत्सवाच्या परीक्षक डॉ. प्रतिभा अग्रवाल, डॉ. सुप्रिया क्षेत्रफळ व डॉ. श्रुती ढाले उपस्थित होते.

यावेळी बोलताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे म्हणाले, 2047 मधील भारत घडवण्याची जबाबदारी आताच्या विद्यार्थ्यांवर आहे. या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी मनपाने आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. अशा विज्ञान महोत्सवातून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक जिज्ञासाला चालना मिळत असते. यासाठी मनपा व मनपाच्या शाळांमधील शिक्षकांनी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय असल्याचे डॉ. पेशवे यावेळी म्हणाले.
मनपाच्या उपायुक्त डॉ. मेघना वासनकर म्हणाल्या, केवळ परीक्षेतील यश विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे नसते तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याची आवश्यकता असते. अशा विज्ञान महोत्सवातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग करण्याची जिज्ञासा निर्माण होते. यातून विद्यार्थ्यांना ज्ञान व विज्ञानाची माहिती मिळत असल्याचे डॉ. वासनकर यांनी सांगितले.
प्रारंभी डॉ. अखिलेश पेशवे, डॉ. मेघना वासनकर यांनी दीपप्रज्वलित करून विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी श्री. अजिंक्य कुलकर्णी यांनी डॉ. मेघना वासनकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याचप्रमाणे प्रकुलगुरु यांचे स्वागत पियूष वानखेडे यांनी केले. यावेळी शिक्षणाधिकारी अमित भदाने व विनय बगळे यांचेही स्वागत करण्यात आले. शिक्षणाधिकारी श्री. अमित भदाणे व इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना परितोषित प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रेणुका चक्रदेव यांनी केले.

*मनपाच्या विद्यार्थ्यांना इस्त्रोमध्ये जाण्याची संधी
मनपाच्या शाळांमधील जवळपास 200 विद्यार्थ्यांनी या विज्ञान महोत्सवात 40 वर अधिक प्रयोग साकारले आहेत. या सर्व वैज्ञानिक प्रयोगांची पाहणी डॉ. अखिलेश पेशवे व डॉ. मेघना वासनकर यांनी यावेळी केली. त्यांनी विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक जिज्ञासेचे, प्रयोगाचे अभिनंदन केले. या विज्ञान महोत्सवातील उत्कृष्ट विज्ञान प्रयोग करणार्या विद्यार्थ्यांना इस्त्रोमध्ये पाठविण्यात येईल, असेही यावेळी आयोजकांतर्फे सांगण्यात आले.
*पुरस्कार विजेते* :
– वरिष्ठ श्रेणी
प्रथम : पीएमश्री संजय नगर हिंदी शाळा नागपूर
दृतीय : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हिंदी शाळा नागपूर
तृतीय : कपिल नगर हिंदी शाळा नागपूर
– कनिष्ठ श्रेणी
प्रथम : पारडी मराठी शाळा नागपूर
दृतीय : जयताळा प्राथमिक शाळा नागपूर
तृतीय : सुनेंद्रगड हिंदी शाळा नागपूर








