हंसराज,भंडारा तुमसर :- तालुक्यातील येरली शिवारात विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तुमसर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर, ट्रॉली आणि १ ब्रास रेतीसह एकूण ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा येरली ते मोहगाव रस्त्याने ट्रॅक्टरद्वारे विनापरवाना रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. एमएच ३६ एएल ९१५९) व ट्रॉली अडवली.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये १ ब्रास रेती आढळून आली. ट्रॅक्टर चालक विक्रांत अजय घरडे (वय २५, रा. येरली, ता. तुमसर) याच्याकडे रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत (रॉयल्टी) विचारणा केली असता, त्याने कोणताही वैध परवाना सादर केला नाही. त्यामुळे अवैध रीतीने रेतीची चोरी व वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी चालक विक्रांत घरडे याच्यासह ट्रॅक्टर मालक छोटू फकीर पटले (वय ४०, रा. येरली) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा स्वराज ट्रॅक्टर व ट्रॉली तसेच ६ हजार रुपये किमतीची १ ब्रास रेती, असा एकूण ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई तिलक चौधरी यांच्या तक्रारीवरून तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०५ (e), ४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव, पोलीस शिपाई तिलक चौधरी, राजु गिरेपुंजे व अजय बावणे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि किशोर घोडेस्वार करीत आहेत.








