spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धोप येथील शेतकरी स्व. राजेंद्र सपाटे यांच्या कुटुंबीयांची परिणय फुके यांच्याकडून सांत्वन भेट

– मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली; दुष्काळ निधी व धान बोनससाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

हंसराज रामटेके, धोप (तुमसर):- पावसाची अनपेक्षित ओढ, दुष्काळी परिस्थिती आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे हाताशी आलेले धान पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने आर्थिक विवंचनेतून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेले धोप (ता. तुमसर) येथील शेतकरी स्व. राजेंद्र सपाटे यांच्या निवासस्थानी जाऊन माजी राज्यमंत्री तथा भाजप नेते डॉ. परिणय फुके यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी सपाटे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत, डॉ. फुके यांनी दिवंगत सपाटे यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च स्वतः उचलत असल्याचे जाहीर केले.

दुष्काळ आणि सिंचनाअभावी पिकांची नासाडी

यंदा पावसाअभावी आणि बावनथडी प्रकल्पातून वेळेवर पाणी न सोडल्यामुळे या परिसरातील धान पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच किडींचा प्रादुर्भाव झाल्याने स्व. राजेंद्र सपाटे यांचे शेतीतील पीक अक्षरशः फस्त झाले होते. या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच डॉ. परिणय फुके यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह तातडीने धोप येथे भेट देऊन कुटुंबीयांना धीर दिला.

यावेळी बोलताना डॉ. परिणय फुके म्हणाले, “शेतकरी हा संपूर्ण समाजाचा अन्नदाता आहे. नैसर्गिक संकटाच्या काळात केवळ शब्दांचे सांत्वन न करता पीडित कुटुंबाला प्रत्यक्ष मदतीचा हात देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. परिस्थिती कितीही बिकट असली, तरी मुलांचे शिक्षण अर्धवट थांबू नये यासाठी त्यांच्या भविष्याला पूर्ण आधार दिला जाईल.” तसेच धान उत्पादक जिल्ह्यांत झालेल्या नुकसानीबाबत नुकतीच छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधींची बैठक झाली असून, नुकसानभरपाई तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत. या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी आर्थिक मदत व धान बोनस तात्काळ मिळावा, यासाठी लवकरच मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन ठोस तोडगा काढू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या सांत्वन भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी (एसडीओ) दिघे, तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, पोलीस निरीक्षक नितीन राठोड, कृषी अधिकारी भडके, स्थानिक तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी भाजप जिल्हा महामंत्री भगवान चांदेवार, जिल्हा परिषद सदस्य देवा इलमे, जगदीश शेंडे, राजेंद्र पटले, मुन्ना पुंडे, अमरीश साणेकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles