spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बदली होऊन चार महिने उलटले तरी कार्यमुक्तीचा प्रश्न अनुत्तरित; वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याची ‘ठाण्यातच’ राहण्याची हट्टाग्रही भूमिका?

पांढरकवडा :- पोलीस विभागातील शिस्तीला हरताळ फाडत, बदली होऊन तब्बल चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी एका वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याने चक्क पांढरकवडा ठाण्यातच ठिय्या मांडल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश कागदावरच असून, संबंधित कर्मचाऱ्याची ‘ठाण्यातच’ चिकटून राहण्याची हट्टाग्रही भूमिका आता चर्चेचा विषय ठरली आहे. यातच गणेशोत्सवाच्या शांतता समितीच्या बैठकीत चक्क ठाणेदारांच्या खुर्चीचा अवमान केल्याचा गंभीर आरोपही या कर्मचाऱ्यावर होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नियम आणि शिस्तीचे धडे देणाऱ्या पोलीस खात्यातच जर नियमांची पायमल्ली होत असेल, तर सामान्य जनतेने दाद मागावी कुणाकडे? असा संतप्त सवाल पांढरकवडा तालुक्यात विचारला जात आहे.

कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतर त्याला विनाविलंब कार्यमुक्त करणे नियमात बंधनकारक असते. मात्र, पांढरकवडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला वादग्रस्त पोलीस कर्मचारी सचिन काकडे याच्या बाबतीत हा नियम कागदावरच राहिल्याचे दिसते. बदलीचे स्पष्ट आदेश येऊनही चार महिने उलटले तरी सचिन काकडे या कर्मचाऱ्याला कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे यामागे स्थानिक पातळीवरील कोणत्या राजकीय किंवा अदृश्य शक्तींचा वरदहस्त आहे, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पांढरकवडा पोलीस ठाण्यात शांतता समितीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या सार्वजनिक आणि संवेदनशील बैठकीत सचिन काकडे या पोलीस कर्मचाऱ्याने चक्क ठाणेदारांच्या खुर्चीचा अवमान केल्याचा गंभीर आरोप होत आहे. पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या पदाचा व आदराचा सन्मान राखणे शिस्तीचा भाग मानला जातो. मात्र, एका कर्मचाऱ्याकडून असे वर्तन घडत असेल आणि वरिष्ठांच्या आदेशांना बगल देऊन तो त्याच ठाण्यात बस्तान मांडून बसत असेल, तर हा पोलिसांच्या अंतर्गत शिस्तीचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचा थेट अवमान मानला जात आहे.

नागरिकांचा सवाल: कार्यमुक्त करण्यास अडचण काय?

बदली होऊन चार महिने झाले तरी सचिन काकडे या कर्मचाऱ्याला अद्याप कार्यमुक्त का करण्यात आले नाही?

वरिष्ठांच्या आदेशांना डावलून पांढरकवडा ठाण्यातच थांबण्यामागचे त्यांचे गुपित काय?

या प्रकारावर पोलीस निरीक्षक व वरिष्ठ अधिकारी मूग गिळून का बसले आहेत?

असे अनेक संतप्त सवाल आता पांढरकवड्यातील सुजाण नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. एकीकडे पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आणि शिस्तीचे पाठ गिरवण्याचे दावे करते, तर दुसरीकडे अशा मर्जीतील कर्मचाऱ्यांमुळे खात्याची पुरती बदनामी होत आहे. आता या प्रकरणी पोलीस अधीक्षक थेट हस्तक्षेप करून सचिन काकडे या कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारणार का? आणि त्यांना तात्काळ कार्यमुक्त करणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Popular Articles