– युथ वेल्फेअर असोसिएशनचा फिल्म सिटी हस्तांतरणाला जाहीर विरोध; न्यायालयीन लढाई लढण्याचाही निर्धार
नागपूर :- रामटेक तालुक्यातील मौजा नवरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक व पर्यटन विकासासाठी प्रस्तावित असलेली जागा फिल्म सिटीसाठी हस्तांतरित करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात युथ वेल्फेअर असोसिएशन, नागपूरने आक्रमक भूमिका घेतली आहे. या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने शैक्षणिक व पर्यटन विकासासाठी नियोजित प्रकल्प उभारण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली असून, फिल्म सिटीला देण्यात आलेल्या जागेच्या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. यासंदर्भात आज आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे.
रामटेक तालुक्यातील मौजा नवरगाव येथील सर्वे क्रमांक ७९/१ मधील एकूण ५२.३४ हेक्टर क्षेत्रापैकी २० हेक्टर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक व पर्यटन विकासाच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी युथ वेल्फेअर असोसिएशन, नागपूरच्या वतीने संबंधित प्राधिकरणाकडे वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. तसेच संबंधित ग्रामपंचायत, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगररचना विभाग आणि अन्य संबंधित विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रे मिळविण्यात आली होती. संघटनेच्या म्हणण्यानुसार, या जागेसाठी मागील अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, रामटेक परिसरातील राज्य शासनाच्या निर्णयानुसार संबंधित जागा फिल्म सिटीसाठी हस्तांतरित करण्यात आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक व पर्यटन विकासाच्या प्रस्तावित प्रकल्पाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या जागेवर शैक्षणिक संकुल आणि विपश्यना केंद्र उभारण्याची संकल्पना होती. त्यामुळे या प्रकल्पासाठी अपेक्षित असलेली जागा दुसऱ्या प्रयोजनासाठी देण्यात आल्याने आंबेडकरी समाजाच्या विकासाच्या अपेक्षांना धक्का बसल्याची भावना संघटनेने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर युथ वेल्फेअर असोसिएशनने फिल्म सिटीसाठी करण्यात आलेल्या जागेच्या हस्तांतरणाचा निषेध केला असून, संबंधित जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक व पर्यटन विकासासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. शासन आणि प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी असल्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रस्तावित शैक्षणिक व पर्यटन विकास प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात पुढील आंदोलनाची दिशा आणि संघटनेची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. पत्रकार परिषदेला युथ वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते म.न.पा.धरम पाटील, ॲड. प्रदीप सोमकुंवर, प्रमोद चिंचखेडे आणि शैलेश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.








