नागपूर :- सायबर जनजागृती महिन्यानिमित्त एडुसन फाऊंडेशनच्या वतीने मिशन सायबर फिट इंडिया अंतर्गत यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, ओंकारनगर, नागपूर येथे ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायबर जनजागृती व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. सायबर सेलच्या आचल चित्तारी आणि एडुसन फाऊंडेशनचे संचालक निलेश काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक व संस्थापक मधुकर दळवेकर होते. मुख्याध्यापिका प्रतीक्षा वाघमारे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. आचल चित्तारी यांनी ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक व संदेश, APK फाईल्स, सायबर बुलिंग, डिजिटल अरेस्ट, सोशल मीडिया, पासवर्ड सुरक्षितता आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले. तसेच गेमिंग व लोन ॲप्सच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. निलेश काळे यांनी विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा संतुलित वापर करून वाचन, प्रत्यक्ष संवाद, स्वतंत्र विचार, लेखन व समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यावर भर द्यावा, असे सांगितले. ChatGPT व इतर AI साधनांचा वापर करताना स्वतःचा विचार आणि विश्लेषण क्षमता जपण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमात प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा व जबाबदार डिजिटल नागरिकत्वाची शपथ घेतली. उपक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.








