– गोंदियाच्या प्रचार सभेत कार्यकर्त्यांनी केला विजयाचा संकल्प
गोंदिया :- पदवीधरांचे प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणे ही माझी भूमिका राहिली आहे. पदवीधरांना भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पदवीधरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी माझा लढा यापुढेही सुरूच राहील, असे प्रतिपादन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजित गोविंदराव वंजारी यांनी केले.
आगामी महाराष्ट्र विधान परिषद नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार, १० ऑक्टोबर रोजी गोंदिया येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पदवीधर मतदारसंघातील विविध प्रश्न, आगामी निवडणुकीचे नियोजन, प्रचाराची दिशा आणि संघटनात्मक तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणुकीला सामोरे जात विजय मिळविण्याचा संकल्प केला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट), विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ (विमाशि) तसेच विविध शिक्षक व कर्मचारी संघटनांच्या पाठिंब्याने ॲड. अभिजित वंजारी हे निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय राखून पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली.
यावेळी माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गोपालदास अग्रवाल, जिल्हाध्यक्ष अमर वराडे, काँग्रेसचे नेते प्रफुल्ल अग्रवाल, नगराध्यक्ष सचिन शेंडे, शहर काँग्रेस अध्यक्ष रविकांत बोपचे, गोंदिया तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश अंबुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती राजकुमार (पप्पू) पटले, बँकेचे सदस्य अमर रंगारी, चंद्रकुमार छोटे, सुनील भालेराव, अजय अग्रवाल, महिला काँग्रेसच्या रूपाली उके, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष मनीष चौव्हाण, रुपेश नशिने आणि सुरेश चौरागडे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने आपापल्या भागातील पदवीधर मतदारांशी संपर्क साधावा, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि महाविकास आघाडीची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, यावर बैठकीत भर देण्यात आला. तसेच सर्व घटक पक्षांनी समन्वयाने काम करून संघटनात्मक ताकद वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.
गोंदिया येथील या बैठकीत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे निवडणुकीच्या तयारीला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. पदवीधरांच्या प्रश्नांवर केंद्रित प्रचार आणि संघटनात्मक समन्वयाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
शिक्षकांच्या हक्कांसाठीचा लढा सुरूच राहणार!
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठीचा लढा हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून, त्यांच्या न्याय्य मागण्यांना मान्यता मिळेपर्यंत तो सातत्याने सुरूच राहील. पदवीधर, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मांडून त्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करणे ही आपली जबाबदारी आहे, अशी भूमिका या बैठकीच्या निमित्ताने आ. अभिजित वंजारी यांनी मांडली.








