– साई सभागृहात रंगणार सुरेल मैफल; पुण्याचे प्रसिद्ध किशोरभक्त रवी गायकवाड यांची विशेष उपस्थिती
नागपूर :- शतकातील महान गायक, अष्टपैलू अभिनेते आणि आपल्या अजरामर गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे स्वरसम्राट स्व. किशोर कुमार यांच्या ३९ व्या पुण्यतिथी निमित्ताने KISHORE KUMAR ALL INDIA FAN’S GROUP च्यावतीने संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता. शंकरनगर येथील साई सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. किशोर कुमार यांच्या अवीट गोडीच्या गीतांची आठवण जागवणाऱ्या या कार्यक्रमात नागपूर मधील उत्कृष्ट गायक आणि गायिका आपल्या सुरेल सादरीकरणातून किशोरदांना संगीतमय आदरांजली अर्पण करणार आहेत. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पुण्याचे प्रसिद्ध किशोरभक्त रवी गायकवाड यांची उपस्थिती. आपल्या मधुर आवाजातून किशोर कुमार यांच्या लोकप्रिय गीतांचा सुरेल नजराणा ते नागपूरकर रसिकां समोर सादर करणार आहेत. किशोरदांच्या सदाबहार गीतांनी संगीत प्रेमींना मंत्रमुग्ध करणारी ही मैफल रसिकांसाठी एक अविस्मरणीय संगीतमय अनुभव ठरणार आहे. किशोर कुमार यांनी आपल्या बहारदार गायकीने हिंदी चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण केले. रोमँटिक, भावपूर्ण, विनोदी आणि जीवनाचा आनंद व्यक्त करणाऱ्या त्यांच्या विविध गीतांनी अनेक पिढ्यांना भुरळ घातली आहे. आजही त्यांची गाणी तितक्याच आवडीने ऐकली जातात. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या संगीताचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला कोणतेही प्रवेश शुल्क नसून सर्व संगीत प्रेमींना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. नागपूरकर संगीत प्रेमींनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक KISHORE KUMAR ALL INDIA FAN’S GROUP, नागपूर, महाराष्ट्र च्यावतीने करण्यात आले आहे.








