spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लाखांदूरमध्ये चुलबंद नदीपात्रात रेतीमाफियांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

– साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त; २१ ट्रॅक्टर, २ टिप्परसह जेसीबी ताब्यात, ३ जणांना बेड्या

– भंडारा पोलिसांची जिल्ह्यातील आजवरची सर्वात मोठी कारवाई; रेतीमाफियांचे धाबे दणाणले

हंसराज भंडारा लाखांदूर :- लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व तस्करीवर भंडारा पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत रेतीमाफियांना मोठा दणका दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तेजस सारडा यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने लाखांदूर-चिचोली मार्गावरील आतली घाट परिसरात धाड टाकली. पोलिसांनी नदीपात्राला चहूबाजूंनी घेराव घालून अवैध रेती चोरी करणारी टोळी आणि वाहने ताब्यात घेतली. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ३ कोटी ४९ लाख ३८ हजार रुपयांचा विक्रमी मुद्देमाल जप्त केला असून जिल्ह्यातील अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून ८० लाखांचे २ ट्रक टिप्पर, ७० लाखांचे २ जेसीबी मशीन, ३० लाखांचे २ ट्रॅक्टर लोडर, १ कोटी ६८ लाख रुपये किमतीचे २१ ट्रॅक्टर आणि १ लाख ३८ हजार रुपये किमतीची २३ ब्रास रेती असा एकूण साडेतीन कोटींचा ऐवज जप्त केला.

पोलिसांनी घटनास्थळावरून राहुल सुरेश परशुरामकर (वय २७, रा. पिंपळगाव कोहळी, ता. लाखांदूर), लुकेश रेशीम गायकवाड (वय ३४, रा. खेडेगाव, जि. गडचिरोली) आणि हेमंत अंताराम बोरकर (वय ३१, रा. लाखांदूर) या तिघांना जागीच अटक केली. कारवाईदरम्यान इतर काही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन वाहने सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी संबंधित आरोपी, वाहन मालक व चालकांविरुद्ध लाखांदूर पोलीस ठाण्यात अप. क्र. ४६९/२०२६, कलम ३०५ (ई) ३(५)भारतीय न्याय संहितेन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे आणि सहायक पोलीस अधीक्षक तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आशिष बोरकर, पोउनि मनोहर गाढवे, सफौ गिरीश बोरकर, पोहवा राजेश टेंभुर्णे, प्रशांत कुरजेकर, ईश्वरदत्त मडावी, सदीप गिऱ्हेपुंजे, टिकाराम कोरे, सुभाष रहांगडाले, पोना वैभव चामट, पोशि रोहित अंबादे, तिरुपती घुगे, स्वप्नील शिवनकर आणि चालक ओमप्रकाश उदापुरे यांच्या पथकाने केली असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Popular Articles