हंसराज,भंडारा पवनी :- महाराष्ट्र शासनाने आरोग्यास घातक असल्याने पूर्णतः बंदी घातलेल्या सुगंधी तंबाखूची छुप्या पद्धतीने साठवणूक आणि विक्री करणाऱ्या एका तस्करावर पवनी पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. शहरातील भाईतलाय वार्ड परिसरात राहणाऱ्या आरोपीच्या घरातून पोलिसांनी तब्बल १ लाख ६१ हजार ५९० रुपये किमतीचा ११३ किलोहून अधिक वजनाचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा कायदा व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवनी शहरातील भाईतलाय वार्ड येथील रहिवासी तौफीक जुनैद बेग (वय ४० वर्ष) हा आपल्या राहत्या घरात शासनाने बंदी घातलेला सुगंधी तंबाखू बेकायदेशीररीत्या साठवून ठेवून त्याची छुप्या मार्गाने विक्री करत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पवनी पोलिसांच्या खबऱ्यामार्फत मिळाली. या माहितीची तत्काळ दखल घेत पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन आरोपी तौफीक बेग याच्या घरावर अचानक छापा टाकला. घराची कसून झडती घेतली असता घरात विविध नामांकित ब्रँड्सचा मोठ्या प्रमाणावर सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला.
पोलिसांनी पंचांसमक्ष केलेल्या कारवाईत ३५ हजार २५० रुपये किमतीचे ‘एम डी ७’ (MD 7) सुगंधी तंबाखूचे १५० पाकिटे (एकूण वजन ३० किलो), १ लाख ६ हजार रुपये किमतीचे ‘होला’ (Hola) सुगंधी तंबाखूचे ८० पाकिटे (एकूण वजन ८० किलो) तसेच २० हजार ३४० रुपये किमतीचे ‘मझा १०८’ (Maza 108) सुगंधी तंबाखूचे १८ बॉक्स (वजन ३ किलो ६०० ग्रॅम) असा एकूण ११३ किलो ६०० ग्रॅम वजनाचा आणि १ लाख ६१ हजार ५९० रुपये किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तौफीक जुनैद बेग याच्याविरुद्ध पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६(२)(iv), २७(३)(क), २७(३)(म), ३०(२)(a) सह शिक्षा कलम ५९ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) चे कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची धडक कारवाई भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे व पवनीचे पोलीस निरीक्षक डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मेश्राम व त्यांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पवनी पोलीस करीत असून, या अवैध तंबाखू रॅकेटचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पसरले आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.








