– मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जयस्तंभ चौकात घोषणाबाजी; पोलिसांच्या सूचनेनंतरही आंदोलन सुरू ठेवल्याने कारवाई
संदीप कांबळे, कामठी :- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी समाजवादी पक्षाच्या वतीने सोमवारी (१२ ऑक्टोबर) कामठीतील जयस्तंभ चौकात विनापरवानगी आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आंदोलनासाठी पूर्वपरवानगी घेतली नसल्याने आणि पोलिसांच्या सूचना देऊनही आंदोलन सुरूच ठेवल्याने नवीन कामठी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
सायंकाळी ४.०५ वाजता समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव परवेज सिद्दिकी यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन सुरू झाले. यावेळी पक्षाचे विदर्भाध्यक्ष तसलीम फैसल, कामठी शहराध्यक्ष तनवीर, युवा अध्यक्ष सूफी आजार अजमेर आणि नागपूर शहराध्यक्ष शान अन्सारी यांच्यासह सुमारे २५ कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करीत त्यांनी घोषणाबाजी केली.
आंदोलनासाठी आवश्यक परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन थांबविण्याची सूचना केली. मात्र, या सूचनेनंतरही आंदोलन सुरू राहिल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ६८ अन्वये सायंकाळी ४.१५ वाजता कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नवीन कामठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ६९ अन्वये सायंकाळी ४.४५ वाजता सर्व कार्यकर्त्यांना सोडण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी घटनास्थळी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .








