– आकर्षक बक्षिस; महिला-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग. सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचाही गौरव
कन्हान :- नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वात आदिशक्ती च्या आराधनेसह गरबा-दांडियाच्या तालावर कन्हान नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. माहेर महिला मंच बहुउद्देशीय संस्था कन्हान व्दारे मुख्य मार्गावरील कुलदीप ग्राउंड येथे ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन आकर्षक विद्युत रोषणाई, देखणी मंडप सजावट आणि रंगारंग नृत्याविष्कारामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा मोठ्या स्वरूपात पारितोषिके ठेवण्यात आल्याने महिला, युवती आणि युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे.
नवरात्रोत्सव म्हणजे शक्तीची उपासना, श्रद्धा आणि संस्कृतीचा जागर. याच परंपरेला आधुनिक सांस्कृतिक व्यासपीठाची जोड देत माहेर महिला मंच दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. गरबा-रासच्या माध्यमातून महिलांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळत असून, दिवसभर घरगुती जबाबदाऱ्या सांभाळून सायंकाळी सरावासाठी वेळ काढणाऱ्या महिलांचा उत्साह लक्षवेधी ठरत आहे. नृत्यामुळे शारीरिक हालचालींसोबत मानसिक प्रसन्नता मिळते, तसेच महिलांमध्ये परस्पर संवाद, एकोपा आणि सांघिक भावना वाढीस लागते. त्यामुळे हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता महिलांच्या सामाजिक सहभागाचे प्रभावी व्यासपीठ बनला आहे.

स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदा इलेक्ट्रिक मोपेड, एलईडी, लॅपटॉप, सायकली, वॉशिंग मशीन आणि म्युझिक सिस्टिम यांसारखी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय प्रथम क्रमांकासाठी १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. आपले सादरीकरण उत्कृष्ट ठरावे आणि पारितोषिक पटकाव ता यावे, यासाठी सहभागी महिला व युवती प्रयत्नशील आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्ष णिक, आर्थिक, पोलीस, पत्रकारिता, वैद्यकीय, शिक्षक , व्यापार आणि वकिली अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनी य कार्य करणाऱ्या मान्यवरांसह गुणवंत विद्यार्थी व संस्थांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला जातो. धार्मिक उत्सवातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संस्थेचा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरत आहे. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष रीता बर्वे, उपाध्यक्ष फाल्गुनी प्रशांत बर्वे आणि सचिव सीमा मनोज मनगटे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन समितीतील मोनिका बर्वे, भूमिका भरणे, सुवर्णा रामापुरे, अश्विनी गाढवे, रेखा धगत, निलीमा फरकाडे कार्यरत आहेत. पूजा समितीत वैशाली बेलनकर, नम्रता बावनकुळे, मिनाक्षी चोपकर, शैला तायवाडे, सारिका छानिकर, वैशाली मोहुर्ले दर्शना तिडके यांचा समावेश आहे. स्वागत समितीत सुनिता भेलावे, मनिषा बर्वे, प्रगती बावनकुळे, विभा ढोके, सुमन भिवगडे, भारती बर्वे आरती राऊत जबाबदारी सांभाळत आहेत. पारितोषिक समितीत रीता बर्वे व आशा खंडेलवाल, तर निर्णायक समितीत स्वाती मस्के व राधिका झेंडे कार्यरत आहेत. धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडविणारा हा महोत्सव कन्हानच्या नवरात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.








