spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धान खरेदी केंद्रे तातडीने सुरू करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

– निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल शेतकरी आर्थिक संकटात; ‘वरातीमागून घोडे’ काढण्याचा प्रकार नको — शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी

हंसराज, भंडारा :- जिल्ह्यात खरीप हंगामातील हलक्या प्रजातीच्या धानाची कापणी सुरू असतानाही राज्य शासनाच्या पणन विभागाकडून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यासंदर्भातील आदेश अद्याप न काढल्याने शेतकरी नव्याने आर्थिक संकटात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात शिवसेनेने म्हटले आहे की, निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून धानाला पाणी पुरवण्यासाठी शेतकरी रात्री-दिवस झटत असताना हलक्या प्रजातीचे धान कापणी व मळणी आधीच सुरू करण्यात आली आहे. मात्र राज्य शासनाने खरेदी केंद्रे सुरू न केल्यामुळे दिवाळी सारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नाईलाजाने मळणीनंतर उत्पादन व्यापाऱ्याकडे नेण्याची वेळ येत आहे. त्यामुळे हमीभावापेक्षा कमी किंमतीत धान खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याचा धोका असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

तसेच लागवडीचा खर्चही यावर्षी निघणार की नाही या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना मळणीनंतर पावसाचा खंड पडल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे. अशा परिस्थितीत शासनाने खरेदी केंद्र सुरू न करण्यामुळे ‘वरातीमागून घोडे’ काढण्याचा प्रकार होत असल्याचे सांगत राज्य सरकारने पणन विभागाच्या माध्यमातून तातडीने आदेश काढून शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

या मागणीसाठी शिवसेना पक्षातर्फे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे, उपजिल्हाप्रमुख किशोर चन्ने व इतर पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. निवेदनाची प्रत राज्याचे पणन मंत्री नामदार जयकुमार रावल यांनाही पाठविण्यात आली आहे.

Popular Articles