किशोर साहू, मौदा :- विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृती रुजावी आणि विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने जिल्हा परिषद प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आवडीची पुस्तके निवडून त्यांचे लक्षपूर्वक वाचन केले. वाचलेल्या पुस्तकातील गोष्टी आपल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थी एकाग्रतेने, समजपूर्वक आणि योग्य उच्चारांसह वाचन करताना पाहून शाळेच्या मुख्याध्यापिका पठाण तब्बसूम अयुबखान पठाण यांना विशेष आनंद झाला. विद्यार्थ्यांच्या वाचनातील प्रगती आणि त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी मुख्याध्यापिका यांनी चंपक इंग्रजी एडिशन ची पुस्तके शाळेला भेट दिली.
पुस्तकांशी मैत्री, नियमित वाचन आणि वाचलेल्या साहित्याचे आकलन या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शब्दसंपत्ती, कल्पनाशक्ती आणि विचारक्षमता विकसित होण्यास मदत होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वाचनाचा आनंद मिळण्यासोबतच स्वतःचे विचार प्रभावीपणे मांडण्याची संधीही मिळाली. ‘वाचाल तर वाचाल, वाचनातूनच घडेल उज्ज्वल भविष्य’ हा संदेश देत शाळेत वाचन संस्कृती जोपासण्याचा संकल्प करण्यात आला.याप्रसंगी केंद्रप्रमुख राजु आंबिलकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अंकुश निरगुळकर, उपाध्यक्ष प्रल्हाद वैद्य तसेच ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ गिर्हेपुंजे ,पोलिस पाटील प्रशांत वाडीभस्मे ,स्वयंपाकी शोभा बावणे आणि अंगणवाडी सेविका ज्योती वाडीभस्मे उपस्थित होते.








