– नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक; रावणदहनस्थळी सुरक्षा, स्वच्छता व विद्युत व्यवस्थेचे नियोजन
संदीप कांबळे, कामठी :- नवरात्रोत्सव आणि दसरा पर्व शांततेत, सुरक्षिततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावे, तसेच रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी कामठी नगर परिषद प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर नगर परिषद कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली. नगराध्यक्ष अजय रुपनारायण अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि विद्युत व्यवस्थेसह विविध महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सण-उत्सवांच्या काळात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून काम करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. विशेषतः रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी आणि संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडावा, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.तसेच उत्सवस्थळ आणि परिसर स्वच्छ ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी आवश्यक खबरदारी घेणे, विद्युत व्यवस्थेची योग्य तपासणी करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सज्ज राहणे, या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. नगर परिषद प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य विभाग आणि विद्युत विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या.सण-उत्सवांच्या माध्यमातून नागरिकांच्या आनंदाला सुरक्षिततेची जोड मिळावी आणि प्रशासनाच्या नियोजनामुळे कार्यक्रम शांततेत पार पडावा, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता.या बैठकीला नगर परिषद मुख्याधिकारी विनोद जाधव, ईश्वरसिंग सीरिया, लालसिंग यादव, चंद्रकांत सीरिया, अमित सीरिया, अंकित सीरिया, जुनी कामठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय दिघे, नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, विद्युत विभागाचे अभियंता सुरेश राठोड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश मोटे, डॉ. निशात शेख यांच्यासह नगर परिषदेचे सहायक अभियंते आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते







