हंसराज,लाखनी :- येथील स्व. निर्धन, पाटील वाघाये महाविद्यालयात ७० वा धम्मचक्र प्रवर्तक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.) विभागाच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या या सोहळ्यात प्रमुख वक्ते डॉ. योगेश करवाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह नागपूर येथील दीक्षाभूमी येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माचा स्वीकार करून भारतीयांना प्रेरणा दिली; अन्यायाला कंटाळून हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
बौद्ध धम्म हा समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता आणि विज्ञानवादी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच डॉ. आंबेडकर यांनी सर्व अनुयायांना दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. चंद्रशेखर देवघरे, प्रा. कवी सूर्यवंशी, प्रा. मनीषा सपाटे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांनी आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेद्वारे मिळालेल्या समानता व शिक्षणाच्या अधिकारांवर भर दिला तसेच दीक्षाभूमीत स्वीकारलेल्या २२ प्रतिज्ञांचा संकल्प दृढ ठेवण्याचा संदेश दिला. सूत्रसंचालन डॉ. पुण्यशिल टेंभुर्णे यांनी, तर मान्यवरांचे आभार प्रा. ज्ञानेश्वरी रहांगडाले यांनी मानले. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








