हंसराज, भंडारा :- जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती असताना साकोली व लाखनी या दोन तालुक्यांना मात्र दुष्काळग्रस्त यादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केला आहे. जिल्ह्यातील भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी व लाखांदूर या पाच तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्यानंतरही साकोली व लाखनीला वगळले गेल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व संशय निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळाचे निकष सर्व तालुक्यांसाठी समान असावेत, राजकीय सोयीनुसार नव्हे, अशी भूमिका खासदार डॉ. पडोळे यांनी मांडली. शेतकऱ्यांची परिस्थिती सारखी असताना काही ठिकाणी मदत आणि इतर ठिकाणी वंचित ठेवणे हा अन्यायकारक प्रकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामागे राजकीय दुजाभाव की राजकीय द्वेषभावना कार्यरत आहे का, असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला.
साकोली व लाखनी तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय कृषिमंत्री यांच्याकडे लेखी पत्राद्वारे निवेदन दिले आहे. शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी हेक्टरी किमान एक लाख रुपये मदत आवश्यक असल्याचे डॉ. पडोळे यांनी सांगितले. मात्र सरकारकडून केवळ पाच हजार रुपये अग्रीम मदत देण्यात येत असल्याबाबत त्यांनी तीव्र टीका केली. त्याच वेळी एप्रिल महिन्यापासूनचे कृषी सन्मान निधीचे दोन हप्ते—एकूण चार हजार रुपये—अद्याप प्रलंबित असल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर दुहेरी अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मदत देताना राजकीय दुजाभाव खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करत साकोली व लाखनीला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.








