spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर अखंडित आणि सुरक्षित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

नागपूर :- दीक्षाभूमीवर अवतरणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांच्या साक्षीने साजरा होणाऱ्या ऐतिहासिक 70 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महावितरण प्रशासनाने चोख नियोजन केले असून, सोहळ्यादरम्यान अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा राहावा यासाठी महावितरणची यंत्रणा पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर, शनिवार, दि. 17 ऑक्टोबर 2026 रोजी शंकर नगर उपविभाग येथे महावितरणच्या शहर मंडलचे अधीक्षक अभियंता प्रफुल लांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारी अभियंता (काँग्रेस नगर विभाग) राहुल जीवतोडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 19 व 20 ऑक्टोबर 2026 रोजी दीक्षाभूमी परिसरात पार पडणाऱ्या सोहळ्यादरम्यान अखंडित व सुरक्षित वीज पुरवठा राखण्यासाठी कर्तव्यावर तैनात राहणाऱ्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची या बैठकीत उपस्थिती होती. या वेळी प्रत्येकाला सोपवण्यात आलेली कर्तव्ये, तातडीच्या प्रसंगी करायचे व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीनंतर लगेचच अधीक्षक अभियंता प्रफुल लांडे आणि कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे यांनी प्रत्यक्ष दीक्षाभूमी येथे भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. सोहळ्याच्या मुख्य मंडपासह संपूर्ण परिसर, मुख्य प्रवेशद्वारे आणि आणीबाणीच्या सेवांसाठी उभारण्यात आलेल्या महावितरणच्या मुख्य ‘सप्लाय पॉईंट्स’ (Supply Points), 33 केव्ही दिक्षाभुमी उपकेंद्राचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. या वेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना विद्युत सुरक्षेसोबतच तांत्रिक अडथळे टाळण्यासाठी आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचे व मार्गदर्शक निर्देश देण्यात आले. यावेळी शंकरनगर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत काकडे यांच्यासह संबधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा हा भव्य सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस तत्पर राहणार असून, दीक्षाभूमी परिसरातील प्रकाशव्यवस्था व वीजपुरवठा सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी महावितरण सज्ज असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

Popular Articles