spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर शाळेच्या प्रांगणात गरब्याचा जल्लोष! चिमुकल्यांच्या दांडियाने रंगले वातावरण

– पारंपरिक वेशभूषा, रंगीबेरंगी पोशाख आणि दांडियाच्या तालावर विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग

किशोर साहू, मौदा :- पी.एम.श्री. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चाचेर येथे गरबा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. पारंपरिक वेशभूषेतील चिमुकल्या विद्यार्थिनी, हातात रंगीबेरंगी दांडिया आणि तालबद्ध नृत्याच्या सुंदर आविष्कारामुळे शाळेचे प्रांगण गरब्याच्या रंगात न्हाऊन निघाले.

भारतीय संस्कृती आणि पारंपरिक लोककलेचे जतन व्हावे, विद्यार्थ्यांना आपल्या सांस्कृतिक परंपरांची ओळख व्हावी, तसेच त्यांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या दृष्टीने अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गरब्याच्या तालावर थिरकणाऱ्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह आणि आत्मविश्वास उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.

रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख, आकर्षक दांडिया आणि नृत्यातील एकरूपता यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने भारावून गेले. विद्यार्थिनींनी आपल्या नृत्यकौशल्यातून भारतीय संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी अनुभव मिळण्याबरोबरच सांघिक भावना, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत होण्यास मदत झाली.

शाळेतील शैक्षणिक उपक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांनाही महत्त्व दिले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे. चिमुकल्यांच्या उत्साही सहभागामुळे हा गरबा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

“शिक्षणासोबत संस्कार, संस्कृती आणि कलागुणांना प्रोत्साहन; हाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया!” असल्याचे मत यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवन सहारे व मुख्याध्यापक अनिल गडपायले यांनी व्यक्त केले.

Popular Articles