– १२ हजार चौरस फुटांच्या डोममध्ये बौद्ध इतिहासाचा भव्य आविष्कार; २२ ऑक्टोबरपर्यंत बुद्ध पार्कला भेट देण्याचे NBC चे आवाहन
नागपूर :- तथागत गौतम बुद्धांचा शांती, करुणा, मैत्री आणि समतेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परिवर्तनवादी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नागपूर बुद्धिस्ट कॉन्सोर्टियम (NBC) च्यावतीने बुद्ध पार्क, बुद्ध नगर, आसी नगर झोन येथे साकारण्यात आलेली ५६ फूट उंच महाबोधी महाविहाराची भव्य प्रतिकृती नागपूरकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. सुमारे १२ हजार चौरस फुटांच्या डोममध्ये उभारण्यात आलेला हा देखावा २२ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांसाठी खुला आहे. बोधगया येथील ऐतिहासिक महाबोधी महाविहाराची आठवण करून देणारी ही प्रतिकृती, डोंगेश्वरी पर्वताचा देखावा आणि तथागत बुद्धांच्या मूर्ती नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्या या उपक्रमातून बौद्ध धम्माचा गौरवशाली इतिहास, भारतीय संस्कृती आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रवास अनुभवण्याची संधी मिळत आहे. विशेषतः विद्यार्थी, लहान मुले आणि तरुणांना इतिहासाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी बुद्ध पार्क परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. प्रबोधनकार विकास राजा आणि सुभाष कोठारे यांनी उपस्थितांना बौद्ध धम्माचा इतिहास, सम्राट अशोकापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचा परिवर्तनाचा प्रवास, नालंदा विद्यापीठाचा ऐतिहासिक वारसा आणि शिक्षणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. बुद्धविचार, समता, बंधुता आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती साधण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही शासकीय आर्थिक मदतीशिवाय तरुणांनी सुमारे तीन महिन्यांच्या अथक परिश्रमातून ही भव्य प्रतिकृती साकारली आहे. अश्विन गणवीर, मिथिलेश गाणार, राकेश धारगावे, छोटू खांडेकर, अमित वांद्रे, देवाभाऊ उमरे आणि अश्विनी गजभिये यांनी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांना नागपूर बुद्धिस्ट कॉन्सोर्टियमच्या संपूर्ण टीमची साथ लाभली. बौद्ध धम्माचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि सामाजिक समतेची मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागपूरकरांनी कुटुंबीयांसह, विशेषतः मुलांना घेऊन, २२ ऑक्टोबर पर्यंत बुद्ध नगरातील बुद्ध पार्कला भेट द्यावी आणि या भव्य देखाव्याचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी सांगितले आहे.








