नागपूर :- वीज वितरणासारख्या अत्यंत आव्हानात्मक आणि अत्यावश्यक सेवेत कार्यरत असताना, नोकरीची जबाबदारी आणि कुटुंबाचा सांभाळ असे दुहेरी आव्हान महिला कर्मचारी लीलया पेलत असतात. या कठीण वाटचालीत नागपूर शहरातील महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांनी केवळ उत्कृष्ट कार्यालयीन सेवाच दिली नाही, तर कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक अशा विविध क्षेत्रांतही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या सर्व कर्तृत्ववान महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा सन्मान करण्यासाठी महावितरणच्या नागपूर शहर मंडळातर्फे विविध कार्यालयांमध्ये ‘सन्मान सौदामिनीचा’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महावितरणच्या सिव्हिल लाईन्स, महाल, गांधीबाग, काँग्रेसनगर आणि बुटीबोरी या प्रमुख विभागांमध्ये हा उपक्रम पार पडला. सिव्हिल लाईन्स विभागात झालेल्या कार्यक्रमात बोलताना नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रफुल लांडे म्हणाले की, कौटुंबिक व व्यावसायिक जबाबदाऱ्यांचा सुरेख समतोल साधत महावितरणच्या महिला अधिकारी व कर्मचारी ज्या निष्ठेने सेवा देत आहेत, त्याचा प्रशासनाला सार्थ अभिमान आहे. या प्रसंगी सिव्हिल लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता धम्मदीप फुलझाले, शहर चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता चंदन तल्लरवार, कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रीती फुले यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध विभागांमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात उपस्थितांनी महिलांच्या योगदानाचे मुक्तकंठाने कौतुक केले. महाल विभागात कार्यकारी अभियंता डॉ. गजानन जयस्वाल यांनी, महिलांनी आपल्या स्व-अनुभवातून प्रेरणा घेत समाजकार्यासाठी स्त्रीशक्तीचा सकारात्मक वापर करण्याचे आवाहन केले. तर बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत टेंभेकर यांनी, पारंपरिक चौकटींना बाजूला सारत महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांनी वीज क्षेत्रातील तांत्रिक व आव्हानात्मक कामांमध्येही स्वतःला उत्तमरीत्या सिद्ध केल्याचे सांगितले. गांधीबाग विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष क्षीरसागर यांनी महिला शक्तीला वंदन करत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याशिवाय, काँग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे यांनी, रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासोबतच आपले छंद जोपासण्यासाठीही आवर्जून वेळ काढला पाहिजे, असा मोलाचा सल्ला दिला.








