spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर कळमेश्वर पोलिसांची कारवाई

– गोंडखैरी येथील पारधी बेड्यावर १५ गुन्हे दाखल; १३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कळमेश्वर :- अवैध हातभट्टी दारू निर्मितीविरोधात कळमेश्वर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत गोंडखैरी येथील पारधी बेड्यावर कारवाई केली. या कारवाईत मोहफुलांपासून गावठी दारू तयार करणाऱ्या १५ जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये १५ गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी एकूण १३ लाख ३५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, घटनास्थळावरील सुरू असलेल्या हातभट्ट्या नष्ट केल्या.

नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली, सावनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या नेतृत्वात २१ ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. कळमेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्यासह पोलीस पथक आणि दंगल नियंत्रण पथकाने या मोहिमेत सहभाग घेतला.

गोंडखैरी परिसरात अवैध हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पारधी बेडा परिसरात छापा टाकून कारवाई केली.

३२ हजार लिटर मोहफुलांचा सडवा जप्त:

या कारवाईत ३२ हजार लिटर मोहफुलांचा सडवा, अंदाजे ११ लाख २० हजार रुपये किमतीचा, तसेच ७६० लिटर मोहफुलांपासून तयार केलेली गावठी दारू, अंदाजे ७६ हजार रुपये किमतीची, जप्त करण्यात आली. याशिवाय प्लास्टिक व लोखंडी ड्रम, डबकी, जळाऊ लाकूड, पाइप आणि दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य, अंदाजे १ लाख ३९ हजार ९०० रुपये किमतीचे, जप्त करण्यात आले. अशा प्रकारे एकूण १३ लाख ३५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी १५ आरोपींविरुद्ध प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण १५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. नाशवंत मुद्देमालाचा पंचनामा करून तो घटनास्थळीच नष्ट करण्यात आला. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात अशा प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Popular Articles