– १५ नोव्हेंबरला श्रींची नागपूर–कोराडी भव्य पायदळ दिंडी यात्रा; २० किलोमीटरच्या भक्तिमय प्रवासात सहभागी होण्याचे भाविकांना आवाहन
नागपूर :- श्री संत गजानन महाराजांच्या भक्तांसाठी श्रद्धा, भक्ती आणि चैतन्याचा अनोखा सोहळा ठरणारी श्रींची नागपूर – कोराडी पायदळ दिंडी यात्रा रविवार, १५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्ट, निर्मल नगरी, नागपूर यांच्या वतीने आयोजित या यात्रेच्या माध्यमातून शेगावची भक्तिगंगा कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिरात अवतरणार आहे. या दिंडी यात्रेत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. श्री संत गजानन महाराजांच्या भक्तीचा जागर करत निघणारी ही पायदळ दिंडी नागपूर आणि कोराडी परिसरातील भाविकांसाठी विशेष धार्मिक महत्त्वाची ठरणार आहे. श्रींच्या नामस्मरणात, भजन- कीर्तनात आणि भक्तिमय वातावरणात सुमारे २० किलो मीटरचे अंतर पार करून दिंडी कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिरात पोहोचणार आहे. या यात्रेमुळे भाविकांना एकत्र येऊन सामूहिक भक्तीचा आनंद अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
*सकाळी प्रस्थान,
दुपारी कोराडीत आगमन
रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता. दिंडीचे प्रस्थान होणार आहे. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता दिंडीचे कोराडी येथे आगमन होईल. दुपारी १ वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १.३० ते २ या वेळेत प्रवचन व कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून, दुपारी २ वाजल्यापासून भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
असा असेल दिंडीचा मार्ग
निर्मल नगरी येथून सुरू होणारी ही दिंडी संस्कारधाम चौक, गणेशपेठ बस स्टँड, कॉटन मार्केट, गणेश टेकडी, आरटीओ कार्यालय, सदर, ताजुद्दीन बाबा दर्गा (पागलखाना), झिंगाबाई टाकळी आणि मानकापूर या मार्गाने कोराडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात पोहोचणार आहे. या मार्गावरून दिंडी पुढे जात असताना विविध ठिकाणचे भाविक सहभागी होऊ शकतील.
महाप्रसादाचे आयोजन
दिंडीच्या समारोपा नंतर कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ वाजल्या पासून भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे. धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाच्या माध्यमातून भक्ती, सेवा आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला जाणार आहे.
श्री संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी या पायदळ दिंडी यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्ट, निर्मल नगरी च्यावतीने करण्यात आले आहे.








