– तोंडलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; कला विकासातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला नवी झळाळी
किशोर साहू, मौदा :- राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा २०२६ चा जिल्हास्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला असून, या स्पर्धेच्या पहिल्या गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली, केंद्र धानोली, पंचायत समिती मौदा येथील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी टितीक्षु गुणवंत मते याने प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक व कलात्मक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली शैक्षणिक प्रगतीसोबतच कला विकासालाही विशेष महत्त्व देत आहे. चित्रकला, हस्तकला, विविध शालेय स्पर्धा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्याचे काम शाळेत सातत्याने केले जाते. विविध स्पर्धांमध्ये आत्मविश्वासाने सहभागी होणारे विद्यार्थी नवनवीन कला आत्मसात करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतात.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच त्यांच्या शारीरिक, भावनिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे आणि सहशिक्षक निलेश जाधव सातत्याने प्रयत्नशील असतात. कृतीतून शिक्षण, उपक्रमांचे प्रात्यक्षिक आणि विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पना व्यक्त करण्याची संधी या माध्यमांतून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यावर शाळेचा भर असतो.
टितीक्षु मते याने मिळवलेले हे यश म्हणजे विद्यार्थ्याच्या कलात्मक आवडीला मिळालेली दाद आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला मिळालेले यश आहे. या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही चित्रकला व इतर कलांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच कलागुणांना प्रोत्साहन देत गुणवत्तेची नवी शिखरे गाठण्याच्या दिशेने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडलीची यशस्वी वाटचाल सुरू आहे. टितीक्षुच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








