– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह वरिष्ठ नेतृत्वाचे मानले आभार; महाराष्ट्रभर अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार
नागपूर :- भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘श्री गुरु रविदास महाराज वस्तीगृह संपर्क अभियान’च्या विदर्भ संयोजकपदी भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर केलेल्या अभियानाच्या प्रदेश समितीत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे अभियान २६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या नियुक्तीबद्दल ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. पक्षाने सोपविलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि समर्पित भावनेने पार पाडत अभियान राज्यभर प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अभियानाची उद्दिष्टे राज्याच्या विविध भागांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदेश समितीच्या माध्यमातून विभागनिहाय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, प्रदेश संयोजकपदी ॲड. धर्मपाल मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली असून, विदर्भ विभागाच्या सहसंयोजकपदी राहुल तुपसांडे यांच्यासह उत्तर महाराष्ट्र विभागाच्या सहसंयोजकपदी प्रा. भानुदास बेरड, मराठवाडा विभागाच्या सहसंयोजकपदी प्रा. पांडुरंग मांडकीकर, पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या सहसंयोजकपदी भरत आमदापुरे आणि कोकण-ठाणे विभागाच्या सहसंयोजकपदी प्रा. वर्षा भोसले माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमुळे अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागनिहाय समन्वय, नियोजन आणि संघटनात्मक कार्याला गती मिळणार आहे.
विद्यार्थ्यांपर्यंत संत गुरु रविदास महाराज यांचे विचार पोहोचविण्यावर भर
‘श्री गुरु रविदास महाराज वस्तीगृह संपर्क अभियान’च्या माध्यमातून वस्तीगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून संत गुरु रविदास महाराज यांचे समतावादी विचार, सामाजिक समरसता, बंधुता, मानवता आणि राष्ट्रहिताची भावना यांचा प्रसार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे, सामाजिक प्रबोधनाला चालना देणे आणि संतांच्या विचारांचा व्यापक प्रसार करणे, ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
विदर्भासह राज्यातील सर्व विभागांमध्ये अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व सहकारी आणि सहसंयोजकांनी परस्पर समन्वयाने, नियोजनबद्ध पद्धतीने आणि समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.
“पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण ताकदीने कार्य करणार आहे. संत गुरु रविदास महाराज यांचे विचार वस्तीगृहांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, सामाजिक प्रबोधनाला चालना देणे आणि अभियानाची उद्दिष्टे तळागाळापर्यंत पोहोचविणे यासाठी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन समन्वयाने काम करणार आहे,” असे ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.
महाराष्ट्रभरातील वस्तीगृहांशी संपर्क वाढवून विद्यार्थ्यांमध्ये संत गुरु रविदास महाराज यांच्या समता, बंधुता आणि मानवतेच्या विचारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.







