– देशभरातील २०० प्रतिनिधींचा सहभाग; आधुनिक निदान पद्धती आणि उपचार प्रक्रियेवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
नागपूर :- रोगनिदान क्षेत्रातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे निदान कौशल्य अधिक विकसित करण्याच्या उद्देशाने रोगनिदान विकृतीविज्ञान पीजी असोसिएशन, नागपूर (RVPGA) च्यावतीने ‘डायग्नोकॉन-२६’ या एंडोस्कोपिक निदानावर आधारित चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन २५ ऑक्टोबर रोजी आर. टी. एम.नागपूर विद्यापीठ परिसरातील गुरुनानक भवन येथे करण्यात आले. देशभरातून सुमारे २०० प्रतिनिधींनी या परिषदेत सहभाग घेतला. आधुनिक निदान पद्धती, प्रत्यक्ष प्रक्रियांचे प्रात्यक्षिक आणि विविध आजारांच्या उपचार व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या परिषदेला महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (MCIM), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, पारुल युनिव्हर्सिटी (वडोदरा), स्वामीनारायण युनिव्हर्सिटी (कलोल) आणि संकलचंद पटेल युनिव्हर्सिटी (गुजरात) यांची मान्यता होती. परिषदेत नागपूरचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रतीक पडोळे यांनी ‘गॅस्ट्रोस्कोपी : निदानात्मक अर्थनिर्वचन आणि उपचारात्मक हस्तक्षेप’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. सौरभ पटले यांनी ‘कोलोनोस्कोपी : निदान आणि उपचारात्मक हस्तक्षेप’, तर डॉ. सिद्धार्थ धांडे यांनी जठरांत्र विकारांच्या निदान आणि उपचारांमध्ये एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडची भूमिका स्पष्ट केली. डॉ. शुभंकर गोडबोले यांनी कॅप्सूल एंडोस्कोपीच्या माध्यमातून निदान व उपचारात्मक हस्तक्षेपाबाबत माहिती दिली. याशिवाय, कान -नाक- घसा तज्ज्ञ डॉ. अजय देशपांडे यांनी ईएनटी विकारांमध्ये एंडोस्कोपीचे महत्त्व विशद केले. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पवन गुल्हाने यांनी हिस्टेरोस्कोपीच्या निदानात्मक आणि उपचारात्मक उपयोगांवर मार्गदर्शन केले. सर्व तज्ज्ञांनी संबंधित प्रक्रियांची कार्यपद्धती, आजारांचे अचूक निदान आणि रुग्णांच्या उपचार व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. उपस्थित प्रतिनिधींनी सर्व व्याख्यानांचे कौतुक केले. परिषदेचे अध्यक्ष आणि RVPGA चे अध्यक्ष डॉ.सुभाष वाघे यांनी सांगितले की, ‘रोगनिदान’ विषयातील निदान पद्धतींवर असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही चौथी राष्ट्रीय परिषद आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आधुनिक निदान तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, त्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढावे आणि निदान कौशल्य अधिक विकसित व्हावे, या उद्देशाने दरवर्षी अशा परिषदांचे आयोजन करण्यात येते. परिषदेच्या उद्घाटन समारंभाला नागपूरचे महाराज श्रीमंत राजे मुधोजी राजे भोसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आर. टी. एम. नागपूर विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण विभागाचे संचालक समित महोरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जळगाव (GAC) चे अधिष्ठाता डॉ. संतोष चव्हाण यांची उपस्थिती होती. उद्घाटनप्रसंगी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अमित नंपल्लीवार यांच्या हस्ते ‘रोगनिदान’ विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. परिषदेत सहभागी झालेल्या सर्व प्रतिनिधींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यशस्वितेसाठी डॉ. विपुल कानानी, डॉ. वैशाली गणोरकर, डॉ. अविनाश राडके, डॉ. अभिनंदन मुके, डॉ. तृप्ती यवतकर, डॉ. भाग्य रंजन दास, डॉ. हेमंत पांचाडे, डॉ. अंकुश डिकोंडवार, डॉ. दर्शना उभाळे, डॉ. स्नेहल राणे, डॉ. अमोल गुजराथी, डॉ. राजेश साव आणि डॉ. भार्गव ठाकोर यांनी विशेष परिश्रम घेतले.








