पांढरकवडा :- दिवाळीच्या सणासुदीतील गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता, पांढरकवडा एसटी आगाराच्या ताफ्यात पाच नव्या अत्याधुनिक जिजाऊ बसेस दाखल झाल्या आहेत. आमदार राजू तोडसाम यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने आगाराच्या परिवहन सेवेला मोठे बळ मिळाले असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळळाला आहे. नव्या बसेसमुळे पांढरकवडा आगारातून पुणे आणि अक्कलकोट यांसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गासह पांढरकवडा, घाटंजी, यवतमाळ मार्गावर नवीन फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन आहे. सणासुदीच्या दिवसांत खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी लूट आणि एसटीमधील प्रचंड गर्दी पाहता ही सुविधा विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि भाविकांसाठी अत्यंत फायदेशीर उरणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे थेट व सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. गतवर्षी आगारात १० नव्या लालपरी बसेस दाखल झाल्या होत्या; आता त्यात अणखी पाच ‘जिजाऊ’ बसेसची भर पडल्याने एकूण ताफा अधिक सक्षम झाला आहे. आमदार राजू तोडसाम यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्याला ही भेट मिळाल्याने नागरिकामधून समाधान व्यक्त होत असून, या बसेसचे प्रत्यक्ष वेळापत्रक कधी जाहीर होते याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दिवाळीच्या सणात खासगी वाहनांचा आधार न घेता प्रवाशांनी महामंडळाच्या सुरक्षित व परवडणाऱ्या एसटी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पांढरकवडा आगाराचे व्यवस्थापक आशिष काकडे यांनी केले आहे.
आमदार राजु तोडसाम यांच्या प्रयत्नाने पांढरकवडा आगारात ५ नव्या “जिजाऊ” बस दाखल









