spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एमएसएमई क्षेत्राला ‘आयपीओ’पर्यंत पोहोचण्यासाठी ‘एमएसएमई राइज-२०२६’चे आयोजन

– उद्योगविस्तार, व्यवसायाचे मूल्यवर्धन आणि भांडवली बाजारातून निधी उभारणीवर होणार मार्गदर्शन

नागपूर :- द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC) अंतर्गत एमएसएमई व स्टार्टअप प्रमोशन कमिटी तसेच नवी दिल्ली येथील संस्थेच्या एमएसएमई व स्टार्टअप प्रमोशन बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी, हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये ‘एमएसएमई राइज- २०२६’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘उत्कर्ष – उद्योगापासून आयपीओपर्यंत : व्यवसायविस्तार, मूल्यवर्धन आणि भांडवल उभारणी’ ही या परिषदेची संकल्पना आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) आर्थिक नियोजन, खर्च व्यवस्थापन, व्यवसायाचे मूल्यांकन, उद्योगविस्तार आणि भांडवली बाजारातून निधी उभारणी यासंदर्भात व्यावहारिक मार्गदर्शन करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. परिषदेतील प्रमुख आकर्षण म्हणजे ‘भांडवली बाजार आणि जलद न्यायप्रक्रिया एमएसएमईच्या विकासाला गती देऊ शकतात का?’ या विषयावरील परिसंवाद. यात नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE), सेबी (SEBI), बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE), असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट बँकर्स ऑफ इंडिया (AIBI) यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, तसेच उद्योजक आणि कायदेतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या परिसंवादात उद्योगांसाठी भांडवलाची उपलब्धता, एसएमई आयपीओच्या संधी, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि व्यावसायिक वादांचे वेळेत निराकरण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. तसेच कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्सची उद्योगांच्या आर्थिक व्यवस्थापनातील भूमिका, खर्चातील स्पर्धात्मकता, व्यवसायाचे मूल्यांकन आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक आर्थिक शिस्त यावरही भर दिला जाणार आहे. केवळ नियमित अनुपालनापुरते मर्यादित न राहता, उद्योगांनी पारदर्शक कारभार, सक्षम आर्थिक पाया आणि दूरदृष्टीच्या आधारे विस्तार साधावा, हा या परिषदेचा संदेश आहे. उद्योगापासून आयपीओपर्यंतचा प्रवास यशस्वी करण्यासाठी योग्य खर्च व्यवस्थापन, भक्कम आर्थिक नियोजन, पारदर्शक प्रशासन आणि विकासाची स्पष्ट दिशा आवश्यक असल्याचे या परिषदेत अधोरेखित केले जाणार आहे. असे पत्रकार परिषदेत सीएमए मनीषा अग्रवाल सोबत चेअरमन रजत नायडू आणि सचिव मनिष पांडे यांनी सांगितले आहे.

Popular Articles