– मेंढपाळासह १७ मेंढ्या जागीच ठार
चंद्रपूर :- मेंढ्यांचा कळप घेऊन जाणाऱ्या मेंढपाळाला अज्ञात ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मेंढपाळासह १७ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास मोरवा-पडोली मार्गावर ही धक्कादायक घटना घडली. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला. पद्माकर नारायण कोरेवार (वय ४३, रा. रामाळा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) असे मृत मेंढपाळाचे नाव आहे.
पद्माकर कोरेवार हे आपल्या दोन सहकाऱ्यांसह मेंढ्यांचा कळप घेऊन काही दिवसांपासून परिसरात वास्तव्यास होते. गुरुवारी ते दोन्ही सहकाऱ्यांसोबत मेंढ्यांचा कळप घेऊन मोरवाकडून पडोली चौकाच्या दिशेने मुख्य मार्गाने जात होते. दरम्यान, पाठीमागून आलेल्या अज्ञात ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला आणि मेंढपाळाला चिरडले. या भीषण अपघातात पद्माकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात १७ मेंढ्यांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पडोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर कोकोडे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधाकर कोकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू
मेंढपाळासह मेंढ्यांच्या कळपाला चिरडून ट्रकचालक पसार झाल्याने पोलिसांनी रस्त्यावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. अज्ञात ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर कोकोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.








