spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पुरेशी झोप होऊनही फ्रेश वाटत नाही ?

झोप चांगली झाली असेल तर पुढचा दिवस चांगला जातो. पण सकाळी उठताना, अंथरुणातून बाहेर पडण्याचा कंटाळा येणं, पुरेशी झोप घेऊनही डोकं जड वाटत असेल, गुंगी येत असेल किंवा थकवा जाणवत असेल, तर या बाबींकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे.

सात ते आठ तासांची झोप घेऊनही ताजंतवानं वाटत नसेल, तर काही सवयींकडे लक्ष दिलं पाहिजे. उदा. दीर्घकाळ एका जागी बसून राहणं, स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणं, शारीरिक हालचालींचा अभाव, किंवा तणावाचा सामना करण्यासाठी धूम्रपान, मद्यपान करणं. या सवयींमुळे थकवा, सुस्ती, चिडचिड आणि तणाव वाढतो. यांकडे दुर्लक्ष केलं, तर यामुळे जीवनशैलीशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात.

आठ तास झोप घेऊनही, उठल्यावर ताजंतवानं, पूर्णपणे विश्रांती मिळाल्यासारखं वाटेलच असं नाही. गोंगाट असलेलं वातावरण, झोपण्याच्या अनियमित वेळा, झोपण्यापूर्वी कॅफिनचं सेवन करणं, स्क्रीनचा वापर करणं, तसंच झोपण्याच्या वेळेच्या अगदी आधी व्यायाम करणं यांसारख्या गोष्टी झोपेत अडथळा आणू शकतात. पुरेशी आणि दर्जेदार झोप मिळवण्यासाठी अशा सवयी टाळणं आवश्यक आहे.

शरीरात पाण्याची कमतरता – रात्रीच्या वेळीही शरीरातील पाण्याची कमतरता होऊ शकते. घाम येणं, लघवी करणं, उष्णतेच्या संपर्कात येणं किंवा आजारपणामुळे शरीरातील पाण्याची पातळी झपाट्यानं कमी होऊ शकते. लघवी खूप फिकट पिवळी किंवा स्वच्छ असेल, तर हे पुरेसं पाणी पीत असल्याचं लक्षण आहे.

अपुरं पोषण – वारंवार फक्त आवडीचेच पदार्थ खाणं पसंत करत असाल, तर संतुलित आहाराच्या अभावामुळे, शारीरिक समस्या वाढू शकतात. शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही, तेव्हा वारंवार जांभया येणं, दिवसभर ऊर्जावान न वाटणं असे अनुभव येऊ शकतात. याचं मुख्य कारण Vitamin B12 किंवा Vitamin D सारख्या पोषक घटकांची कमतरता हे असू शकतं, ज्यामुळे थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.

मर्यादित शारीरिक हालचाल – शारीरिक निष्क्रियता आणि झोप यांचा घनिष्ट संबंध आहे. व्यायाम टाळला किंवा खूप कमी शारीरिक हालचाल केली, तर रात्रीच्या झोपेची गुणवत्ता खालावू शकते आणि दिवसभर सतत थकवा जाणवू शकतो. दररोज दीडशे मिनिटं व्यायाम करण्याचं ध्येय ठेवा आणि आपल्या दिनचर्येत योगासनं, ध्यानाचा समावेश करण्याचा विचार करा.

तणाव व्यवस्थापन – तणावामुळे झोपेचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतं किंवा अनेकदा झोप लागत नाही. त्यामुळे, तणावाचं आरोग्यदायी पद्धतीनं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, सकाळी फिरायला जाणं, संगीत ऐकणं किंवा आवडतील अशा गोष्टींमधे वेळ घालवा. तणाव कमी होत नसेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाचं पालन करा.

थकव्याकडे दुर्लक्ष नको – थकवा येणं किंवा ऊर्जेची कमतरता या गोष्टींकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. आजच्या जीवनशैलीत लोक सहसा एखाद्या विशिष्ट समस्येचा किंवा आजाराचा सामना करावा लागेपर्यंत गोष्टी गांभीर्याने घेत नाहीत; पण प्रत्यक्षात, हेच आजारी पडण्यामागचं एक मुख्य कारण असतं.

रात्री उशीरा जेवणं, आहारात योग्य पोषक घटकांचा अभाव, अपुरी झोप आणि शारीरिक हालचालींची कमतरता हे सर्व घटक एकमेकांशी संबंधित आहेत. यापैकी कशाकडेही दुर्लक्ष केलं तर ऊर्जा कमी होऊ शकते, तणाव वाढू शकतो आणि याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर आजारपणही ओढवू शकतं.

– झोपण्यापूर्वी एक तास आणि उठल्यानंतर एक तास मोबाईल फोन किंवा स्क्रीनचा वापर टाळा.

– तणाव कमी करण्यासाठी आवडणाऱ्या गोष्टी करा किंवा एखाद्या छंदाचा सराव करा.

– व्यायाम आणि योगासनांसारख्या शारीरिक हालचालींमुळे झोपेची गुणवत्ता सुधारेल.

– डोक्यात सतत जडपणा जाणवणं, थकवा वाटणं, हे कधीकधी थायरॉईडच्या समस्या किंवा मधुमेह यांसारख्या अंतःस्रावी विकारांशी संबंधित असू शकतं.

– डॉक्टरांचा सल्ला घ्या.

– ॲनिमियामुळे शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याची रक्ताची क्षमता कमी होऊ शकते.

– ऑटोइम्यून आजार चयापचय क्रिया आणि झोपेच्या पद्धतींवर परिणाम करू शकतात.

– मूत्रपिंडं नीट काम करत नसतील, तर रक्तात विषारी पदार्थ साचल्यामुळे थकवा जाणवू शकतो.

Popular Articles