भंडारा :- माणसाच्या आयुष्याचा शेवटचा प्रवासही सन्मानाने व्हावा, ही अपेक्षा भंडारा जिल्ह्यातील ९२ महसुली गावांमध्ये अद्याप अपूर्ण आहे. या गावांमध्ये स्मशानभूमीची सुविधा नसल्याने नागरिकांना उघड्या जागेत, नदीकाठी किंवा रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय स्थितीनुसार, पवनी तालुक्यातील २१ महसुली गावांमध्ये स्मशानभूमी उपलब्ध नाही. तुमसरमध्ये १७, साकोलीत १२, भंडारा आणि मोहाडीमध्ये प्रत्येकी १०, लाखनीत ९, तर लाखांदूर तालुक्यात एका गावात स्मशानभूमी नाही. अशा एकूण ९२ गावांमध्ये ७२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. काही गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे, तर काही ठिकाणी जागा मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आश्वासनांऐवजी सुविधा द्या !
जिल्ह्यातील २२ गावांतील नागरिकांना स्मशानभूमीची सुविधा मिळण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा, निधीची तरतूद व प्रत्यक्ष कामांना गती देणे आवश्यक आहे. आश्वासनांऐवजी सुविधा कधी मिळणार? हा नागरिकांचा प्रश्न आहे. सुविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. तर अनेक ठिकाणी जीर्ण शेड तुटले असून भंगार अवस्था आहे. काही जागा मिळाल्यानंतरही बांधकाम आणि आवश्यक सुविधांसाठी निधी उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे.
कार्यवाहीचे आश्वासन, मात्र कृतीची जोड कधी ?
गावातील नागरिकांना अंत्यसंस्काराची सुविधा उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतींची महत्त्वाची जबाबदारी आहे. जागा उपलब्ध असलेल्या गावांमध्ये आवश्यक कार्यवाहीला प्राधान्य दिले जाईल, तर जागेचा प्रश्न असलेल्या गावांमध्ये यंत्रणांशी समन्वय साधून तोडगा काढण्यात येईल, असे प्रशासनाकडून अनेकदा सांगितले जाते. परंतु, कृतीची जोड दिली जात नसल्याने प्रश्न अद्यापही कायम आहेत.
प्रसंगी अन्य गावांचा आधार
स्मशानभूमीअभावी पावसाळ्यात नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी पर्यायी जागांचा आधार घ्यावा लागतो. पाऊस सुरू असल्यास चिता पेटविणे आणि अंत्यविधी पूर्ण करणे कठीण होते. काही वेळा मृतदेह पूर्णपणे न जळण्याची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे मृत व्यक्तीच्या सन्मानाचा प्रश्न उपस्थित होतो. काही गावांतील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी दुसऱ्या गावात जावे लागते. मोहाडी तालुक्यातील पाच महसुली गावांमध्ये दफनभूमीची सुविधाही उपलब्ध नसल्याची नोंद आहे.
आनुषंगिक कामांना प्राधान्य ?
दरवर्षी जनसुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध केला जातो. मात्र, अस्तित्वात असलेल्या स्मशानभूर्मीमध्ये दशक्रिया शेड, पेव्हर ब्लॉक, संरक्षक भिंत आणि काँक्रिटीकरणासारख्या कामांवर भर दिला जात असल्याचे चित्र आहे. परिणामी, स्मशानभूमीच नसलेल्या गावांचा प्रश्न कायम आहे. स्मशानभूमी नसलेल्या गावांना प्राधान्य देऊन जागा, निधी आणि बांधकामाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे.








