अकोला :- बाल लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दादाराव श्रीराम अजने (वय ४०, रा. अकोली जहाँगीर, ता. अकोट, जि. अकोला) असे दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक वर्षाच्या अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागेल.
पीडितेवर लैंगिक अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी
२ फेब्रुवारी २०२२ रोजी आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार करून तीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणामुळे पीडिता व तीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून सर्व घटनाक्रम सांगितला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. पीडितेच्या तक्रारीवरून अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३७६ (२) (एफ) (जे) (एन), ३७६ (२) (एन), ३७६ (एबी), ३७७, ५०६, भादवि सहकलम ४,५ (एल) (एम) (एन), ६ बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास करण्यात आला. प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋतु खोखर यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीला ठरवले दोषी
न्यायालयात सुनावणीदरम्यान साक्षी-पुरावे सादर करण्यात आले. न्यायालयात आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक वर्षाच्या अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने दिली. या खटल्यात सरकारी अभियोक्ता अजित देशमुख यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. या प्रकरणाच्या तपासासाठी व न्यायालयीन कामकाजाच्या पाठपुराव्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, अकोट विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील आणि अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात आले. पैरवी अधिकारी पोलीस हवालदार शंकर राऊत यांनीही प्रकरणाचा पाठपुरावा केला. बाल लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात न्यायालयाने सुनावलेल्या या कठोर शिक्षेमुळे गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत कठोर परिणामांना सामोरे जावे लागते, हे अधोरेखित झाले आहे.







