– २४ पोती प्लास्टिकसह एक लाखांचा माल जप्त
अमरावती :- ‘स्वच्छ अमरावती – प्लास्टिकमुक्त अमरावती’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने शहरात प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात धडक मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत कर वसुली आणि जप्ती पथकाने मसानगंज परिसरातील एका गोडाऊनवर धाड टाकून तब्बल ७२५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक कॅरिबॅगचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे एक लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून संबंधितांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार, २७ ऑक्टोबर रोजी ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. मसानगंज भागातील एका गोडाऊनमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा लपवून ठेवल्याची खात्रीशीर माहिती मनपा प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने अचानक छापा टाकला असता, तिथे प्लास्टिकचा मोठा साठा आढळून आला.
२४ कट्ट्यांमध्ये भरला होता एक लाखांचा माल
या धडक कारवाईदरम्यान गोडाऊनची झडती घेतली असता, प्रतिबंधित प्लास्टिक कॅरिबॅगची एकूण २४ मोठी पोती (कट्टे) आढळून आली. पथकाने सर्व २४ पोती जप्त केली असून, मोजणी केली असता या प्लास्टिकचे एकूण वजन ७२५ किलो भरले. या जप्त केलेल्या प्लास्टिक मालाची बाजारपेठेतील अंदाजे किंमत १ लाख रुपये आहे. बंदी असलेल्या या प्लास्टिकच्या साठवणुकीबद्दल गोडाऊन मालकावर ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली.
मनपाचे अधिकारी व कर्मचारी मैदानात
आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या यशस्वी मोहिमेत प्लास्टिक बंदी नोडल अधिकारी ए. के. गोहर, स्वास्थ्य निरीक्षक सचिन सैनी, मेघराज ढेणवाल यांच्यासह अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित बीटप्यून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रशासनाचे व्यावसायिकांना आवाहन
शहरातील प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, साठवणूक आणि छुप्या पद्धतीने होणारी विक्री पूर्णपणे रोखण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे. यापुढेही शहरातील बाजारपेठा आणि गोडाऊनवर अशीच अचानक तपासणी करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. शहर स्वच्छ व प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी नागरिक आणि व्यावसायिकांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.







