– नगरसेवक आकाश भोकरे यांच्या तत्परतेने सर्पमित्राकडून नागाचे सुरक्षित रेस्क्यू
कामठी :- कामठी शहरातील कुंभारे कॉलनी परिसरात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पानवठ्याजवळ सुमारे पाच फूट लांबीचा कोब्रा नाग आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी याबाबत नगरसेवक आकाश प्रदीप भोकरे यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाइल्ड लाइफ वेल्फेअर सोसायटीचे सर्पमित्र अनिल बोरकर यांना पाचारण केले. सर्पमित्राने शिताफीने नागाला सुरक्षितरीत्या पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.
सध्या पाण्याची टंचाई आणि प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थितीमुळे वन्यजीवांना पाण्याच्या शोधात आपला नैसर्गिक अधिवास सोडून मानवी वस्तीजवळ येण्याची वेळ येत आहे. त्यामुळे नागरी वस्त्यांमध्ये साप आढळण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. कुंभारे कॉलनीतील पानवठ्याजवळ कोब्रा नाग दिसून आल्याने परिसरातील नागरिक सतर्क झाले.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक आकाश प्रदीप भोकरे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून सर्पमित्र अनिल बोरकर यांना बोलावले. घटनास्थळी दाखल झालेल्या बोरकर यांनी आवश्यक काळजी घेत नागाला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या तत्पर कारवाईमुळे संभाव्य धोका टळला.








