spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

साखरेचा अतिरेक ठरतो घातक!

दिवाळी जवळ आली की फराळ, गोड पदार्थ तयार करण्याची तयारी घराघरांत सुरु असते. सण-उत्सव मिठाईशिवाय अपूर्ण वाटतात. रसगुल्ले, गुलाबजाम, लाडू, बर्फी आणि चॉकलेट्ससारख्या गोड पदार्थांचा आस्वाद घेतला जातो.

अधूनमधून मिठाई खाणं हानिकारक नसतं, पण नियमितपणे अति प्रमाणात साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्यानं आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. दिवाळीत आनंद, आग्रहाच्या भरात अति प्रमाणात गोड पदार्थ खाल्ले जाऊ शकतात. अति गोड खाण्यानं शरीराला होणाऱ्या संभाव्य हानीबद्दल आणि साखरेची सवय कशी नियंत्रणात आणता येईल, ते समजून घेऊया.

अति प्रमाणात गोड पदार्थ खाण्याचे संभाव्य आरोग्य धोके:

– वेगानं वजन वाढणं – गोड पदार्थांमधे साखर आणि कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. त्यांचं वारंवार सेवन केल्यानं शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होऊ शकतात. या कॅलरीज ऊर्जेच्या स्वरूपात वापरल्या गेल्या नाहीत, तर वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो. दररोज गोड पदार्थ, केक, चॉकलेट्स आणि साखरयुक्त पेयांमुळे वजन वाढू शकतं.

– रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम – जास्त साखर असलेले पदार्थ खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी वेगानं वाढू शकते. ही पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शरीराला इन्सुलिन तयार करावं लागतं. दीर्घकाळ साखर जास्त खाणं आणि चुकीच्या आहारपद्धतीमुळे टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी गोड पदार्थ खाताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

– दात किडण्याचा धोका – जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्यानं दातांवरही परिणाम होतो. तोंडातील जीवाणू साखरेचा वापर करून आम्ल तयार करतात, ज्यामुळे दातांवरील संरक्षक थर खराब होऊ शकतो. यामुळे दातांमधे पोकळी निर्माण होऊन दात किडू शकतात. म्हणूनच, गोड पदार्थ खाल्ल्यानंतर चूळ भरा आणि दिवसातून दोनदा दात घासण्याची सवय ठेवा.

– फॅटी लिव्हरचा वाढता धोका – फ्रुक्टोजचं अतिसेवन, साखर आणि साखरयुक्त पेयांमुळे यकृतामधे चरबी साचण्याचा धोका वाढतो. बराच काळ साखर अधिक प्रमाणात खाल्ल्यानं ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ – NAFLD होऊ शकतो, ज्याला आता ‘मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टिएटोटिक लिव्हर डिसीज’ – MASLD असंही म्हटलं जातं.

– हृदयाच्या आरोग्यावर होणारा संभाव्य परिणाम – अतिरिक्त साखरेमुळे लठ्ठपणा, ट्रायग्लिसराइडची पातळी वाढणं आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. या सर्व गोष्टींमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, दररोज अति प्रमाणात गोड पदार्थ किंवा साखरयुक्त पेयांचं सेवन करणं टाळलं पाहिजे.

– मुरुमं आणि त्वचेसंबंधित समस्या – high glycemic index असलेले पदार्थ आणि मुरुमं यांच्यात संबंध असू शकतो असं काही अभ्यासांतून दिसून आलं आहे. साखरेचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्यानं काही व्यक्तींना मुरुमांची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. पण, त्वचेवर होणारा हा परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळा असू शकतो.

गोड खाण्याची तीव्र इच्छा होत असेल, तर… 

– आहारात फळांचा समावेश करा: काहीतरी गोड खाण्याची इच्छा होईल, तेव्हा आंबा, – सफरचंद, संत्री किंवा पपई यांसारखी फळं खाऊ शकता.

– पुरेसं पाणी प्या: दिवसभरात पुरेसं पाणी पिण्याची सवय लावा.

गोड पदार्थ मर्यादित खा…

– साखरयुक्त पेयं टाळा: शीतपेयं, डबाबंद फळांचे रस आणि गोड शेक्सचं सेवन मर्यादित ठेवा.

– नेहमी लेबल वाचा: डबाबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यात किती साखर घातली आहे, हे तपासा.

– संतुलित आहार घ्या: जेवणात प्रथिनं, तंतुमय पदार्थ आणि संपूर्ण धान्याचा समावेश करा.

Popular Articles