– शीतला माता मंदिर ते खाम तलाव रेल्वे क्रॉसिंगदरम्यानच्या उर्वरित रस्त्याला केंद्रीय मंत्रालयाची मान्यता
हंसराज, भंडारा :- भंडारा शहरातील शीतला माता मंदिर ते खाम तलाव रेल्वे क्रॉसिंगपर्यंतच्या रस्त्याच्या उर्वरित बांधकामासाठी ११ कोटी ९५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मंजुरी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून मिळाली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रस्ता भंडारा शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असून, त्याच्या कामाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती.
खासदार डॉ. पडोळे यांनी या कामासाठी ७ जुलै २०२६ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री अजय टम्टा यांनी ऑक्टोबर २०२६ मध्ये पाठविलेल्या अधिकृत पत्राद्वारे कामाला मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार डॉ. पडोळे यांना कळविली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४७ वरील भंडारा-घोटीटोक विभागातील किलोमीटर १६८/१८० ते १६८/९२० या शीतला माता मंदिर ते रेल्वे क्रॉसिंगदरम्यानच्या उर्वरित रस्त्याचे बांधकाम आता हाती घेण्यात येणार आहे.
खासदार डॉ. पडोळे यांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याच्या कामामुळे शहरातील वाहतूक सुलभ होण्यास, प्रवासाचा वेळ कमी होण्यास आणि नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्यास मदत होईल. केंद्रात आणि राज्यात विरोधी पक्षाची भूमिका असतानाही मतदारसंघासाठी आवश्यक निधी मिळावा, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ता असो वा नसो, जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा केल्यास शासनाकडून विकासकामांना मंजुरी मिळू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
भंडारा शहरासह संपूर्ण भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, शेती आणि रोजगार या प्रश्नांचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे खासदार डॉ. पडोळे यांनी स्पष्ट केले. आता मंजुरी मिळाल्यामुळे रस्त्याच्या उर्वरित कामाची पुढील प्रक्रिया संबंधित यंत्रणेमार्फत पार पडणार आहे.








