– दत्तक पालकांचे पालकत्वाचे स्वप्न साकार ;
– जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आदेश वितरित
यवतमाळ :- महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दत्तक विधान नियमावली २०२२ अंतर्गत जिल्ह्यात प्रथमच तीन दत्तक विधान आदेश यशस्वीरीत्या पारित करण्यात आले आहेत. या प्रक्रियेमुळे तीन बालकांना प्रेम, माया, सुरक्षितता आणि हक्काचे कुटुंब मिळाले असून, दत्तक पालकांचे अनेक वर्षांपासूनचे पालकत्वाचे स्वप्न साकार झाले आहे.
दत्तक विधान ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून, बालकांना प्रेमळ कुटुंब, सुरक्षित वातावरण आणि उज्ज्वल भविष्य देणारी संवेदनशील सामाजिक प्रक्रिया आहे. जिल्ह्यातील या तीनही दत्तक प्रकरणांमध्ये बालकांच्या सर्वोत्तम हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. त्यासाठी आवश्यक कायदेशीर तरतुदींची पूर्तता, कागदपत्रांची पडताळणी तसेच विविध स्तरांवरील प्रक्रिया पूर्ण करून संपूर्ण दत्तक विधान प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यात आली.
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी संबंधित दत्तक विधान आदेश पारित करून या संवेदनशील प्रक्रियेला अंतिम मान्यता दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बाल न्याय यंत्रणा आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
बालकांच्या सर्वोत्तम हिताला प्राधान्य
जिल्ह्यात तीन दत्तक आदेश पारित झाल्यामुळे जिल्ह्यात दत्तक विधान प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या सर्वोत्तम हिताची जपणूक आणि त्यांना सुरक्षित कौटुंबिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
अधिकृत दत्तक प्रक्रियेचा अवलंब करण्याचे आवाहन
पात्र व इच्छुक दाम्पत्यांनी बालक दत्तक घेताना कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा मध्यस्थाचा अवलंब न करता केवळ अधिकृत व कायदेशीर दत्तक प्रक्रियेचाच अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
दत्तक विधानाद्वारे मुल मिळाल्याने पालकांवर मोठी जबाबदारी आली आहे. सध्याचा काळ आव्हानात्मक असून, बालकाचा योग्य सांभाळ, संगोपन आणि शिक्षण याकडे विशेष लक्ष देऊन त्याचे उज्ज्वल भविष्य घडवावे. कायदेशीर पालकत्व स्वीकारल्यानंतरही दोन्ही कुटुंबांनी बालकांचे संगोपन करावे आणि समाजासमोर एक चांगले उदाहरण निर्माण करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी दत्तक पालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात आले.








