हिवाळ्याची सुरुवात होते आहे. थंड हवेत अनेकांना सुस्ती आणि आळस जाणवू लागतो. थंडीमुळे सकाळी अंथरुणातून उठण्याची किंवा व्यायाम करण्याची इच्छा कमी होते.
हिवाळ्यात, आपल्या दिनचर्येत योगासनांचा समावेश करुन तंदुरुस्त आणि सक्रिय राहणं गरजेचं आहे. नियमित योगाभ्यासा केल्यानं शरीराची लवचिकता टिकून राहते, स्नायू सक्रिय राहतात आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. योगासनं करण्यासाठी जिममधे जाण्याची, कुठल्याही उपकरणांची गरज नसते. घरीच काही सोपी योगासनं करून शारीरिक तंदुरुस्ती टिकवून ठेवू शकता. हिवाळ्याच्या हंगामासाठी फायदेशीर ठरणारी काही योगासनं पाहूया.
– सूर्यनमस्कार – हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार करणं फायदेशीर आहे. यात बारा योगासनांचा समावेश असतो. सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीराच्या विविध भागांवर ताण पडतो म्हणजेच सर्व भागांना चांगला स्ट्रेच मिळतो आणि स्नायू सक्रिय राहतात. सूर्यनमस्कार करण्यासाठी, योगा मॅटवर सरळ उभं राहून सुरुवात करा. दोन्ही हात जोडून प्रार्थना मुद्रेत या. आता, श्वास घेणं आणि सोडणं या क्रियेसह ही आसनं करा. हळूहळू सराव वाढवा.
– ताडासन – ताडासनाला माऊंटन पोज असंही म्हणतात. शरीराची ठेवण सुधारण्यासाठी आणि संतुलन राखण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरतं. हे आसन करण्यासाठी, दोन्ही पाय जवळ ठेवून सरळ उभं राहा.
दोन्ही हात वरच्या दिशेला उचलून बोटं एकमेकांत गुंफून घ्या. आता, टाचा जमिनीवरून वर उचला आणि पायांच्या बोटांवर उभं राहण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत काही सेकंद थांबा आणि त्यानंतर हळूहळू पुन्हा सामान्य स्थितीत परत या.
– भुजंगासन – भुजंगासनाला कोब्रा पोझ – Cobra Pose असंही म्हणतात. हे आसन पाठ आणि पोटाच्या भागातील स्नायूंना ताण देण्यास मदत करतं. यासाठी, योगा मॅटवर पालथं झोपा. दोन्ही तळहात खांद्यांच्या जवळ ठेवा. श्वास घ्या आणि हळूहळू छाती वरच्या दिशेला उचला. काही सेकंद या स्थितीत राहा, त्यानंतर हळूहळू पुन्हा खाली या.
– त्रिकोणासन Triangle Pose – त्रिकोणासनामुळे शरीराच्या दोन्ही बाजूंचं स्ट्रेचिंग होतं. हे आसन पाय, कंबर आणि नितंबांच्या स्नायूंना ताण देण्यासाठी उपयुक्त आहे. हे आसन करण्यासाठी, सरळ उभं राहा आणि दोन्ही पायांमधे अंतर ठेवा. दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत बाहेरच्या दिशेला पसरवा. हळूहळू एका बाजूला वाका आणि आपल्या हातानं पायाला किंवा घोट्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. दुसरा हात वरच्या दिशेला सरळ ताणलेला ठेवा. काही सेकंदांनंतर, हीच क्रिया दुसऱ्या बाजूला पुन्हा करा.
– वृक्षासन – Tree Pose – वृक्षासनाला ट्री पोज – Tree Pose असंही म्हणतात. हे आसन शरीराचा समतोल सुधारण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करू शकतं. हे आसन करण्यासाठी, सरळ उभं राहा आणि एक पाय गुडघ्यातून वाकवा. त्या पायाचा तळवा दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. दोन्ही हात डोक्याच्या वर नेऊन नमस्कार करतो त्या मुद्रेत जोडा. या स्थितीत काही वेळ थांबा आणि त्यानंतर दुसऱ्या पायानंही हीच कृती करा.
या आसनांमुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीराची लवचिकता जपण्यासाठी मदत होते.








