बुटीबोरी :- एमआयडीसी बुटीबोरी भागातील मुख्य मार्गावर सुरू असलेल्या बांधकामादरम्यान निर्माण झालेल्या रस्ते सुरक्षाविषयक समस्यांची गंभीर दखल घेत हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर ग्रामीण पोलीसांनी अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी पुढाकार घेतला. नागपूर ग्रामीण पोलीसांनी केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांनी सुचविण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करून सुरक्षा उपयोजना केल्या आहे.
नमुद मार्गावर जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत झालेल्या रस्ते अपघातांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता. सदर मार्गावर सुरू असलेल्या बांधकामामुळे वाहनचालक आणि इतर रस्ते वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध धोके निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर नागपूर ग्रामीण पोलीसांनी सुमारे ४.१ किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील रस्ते सुरक्षेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले.
दिनांक २३/०९/२०२६ रोजी याच मार्गावर बसच्या धडकेत सागर पद्माकर लोखंडे यांचा मृत्यू झाला होता. या अपघातप्रकरणी बुटीबोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपासादरम्यान बसचालकासह रस्ते सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना करण्यात दुर्लक्ष केल्याच्या अनुषंगाने जी. आर. इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड या बांधकाम कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांना सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
अपघातांची वाढती संख्या आणि बांधकामामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन नागपूर ग्रामीण पोलीसांनी संबंधित रस्ता प्राधिकरण असलेल्या महामेट्रोकडे रस्ते सुरक्षेच्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. रस्ते सुरक्षा तज्ज्ञांच्या तांत्रिक सहकार्याने या मार्गाची सविस्तर पाहणी व सुरक्षा मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर वाहनचालकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक अभियांत्रिकी सुधारणा आणि सुरक्षा उपाययोजनांची शिफारस महामेट्रोकडे करण्यात आली. यामध्ये १. बांधकाम क्षेत्रात योग्य बॅरिकेडिंग व वाहतूक व्यवस्थापन करणे, २. रात्रीच्या वेळी रस्त्याची दृश्यमानता वाढविण्यासाठी Reflective Hazard Markers बसविणे, ३. आवश्यक ठिकाणी Road Marking, Road Studs व Delineators बसविणे, ४. संभाव्य धोक्यांची पूर्वसूचना देण्यासाठी दिशादर्शक व सूचना फलक लावणे. तसेच बांधकामामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके ओळखून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अशा सुधारणा आणि सुरक्षा उपाययोजनांची शिफारस महामेट्रोकडे करण्यात आली होती
नागपूर ग्रामीण पोलीसांनी केलेल्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत महामेट्रोने या शिफारशीनुसार आवश्यक रस्ते सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी पूर्ण केली आहे. या कामाबद्दल नागपूर ग्रामीण पोलीसांनी महामेट्रोचे आभार मानले असून, रस्ते सुरक्षेच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन शिफारशीनुसार आवश्यक कामे वेळेत पूर्ण केल्याबद्दल महामेट्रोच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.








